Satara News : ध्येयाने झपाटलेले पत्रकार - शंकर पाटील

न्यायाबद्दलची प्रचंड चीड आपल्या लिखाणाद्वारे दाखवणारे कराडचे ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील अर्थात सर्वांचे बापू यांचा आज ८५ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने खरेतर भरपूर लिहिण्यासारखे आहे. परंतु मला जे भावले ते मी येथे मांडत आहे. 


शंकर पाटील यांचे वडील  सखाराम बहिर्जी पाटील यांच्याकडून पत्रकारितेचा वारसा घेऊन नंतर स्वत: पत्रकारिता केलेले आणि आता आपला मुलगा विजय यालाही पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत ठेवणारे आमचे ज्येष्ठ सहकारी पत्रकार सन्मित्र शंकर उर्फ बापू पाटील हे आज ८५ व्या वर्षातून ८६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने शंकर पाटील काय व्यक्तिमत्त्व आहे ते अलीकडच्या पिढीला कळावे यासाठीच हा लेखन-प्रपंच आहे

काही काही पत्रकार हे आपल्या विचाराने आणि ध्येयाने प्रेरित होऊन आपले काम करीत असतात आणि असाच एक खरोखरच अवलिया माणूस कराड येथे पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे सक्रिय राहुन काम करत आहे. 

त्यांच्याकडे बघितले की हे पत्रकार आहेत ? असा प्रश्र्न निर्माण होतो. आत्ताच्या पिढीच्या नजरेसमोर पत्रकार म्हटले की विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान केलेले आणि हातात डायरी किंवा कागदाचे भेंडोळे असे व्यक्तिमत्व नजरेसमोर येते. 

परंतु कराडचा असा एक पत्रकार आहे की त्याने कपड्यांच्यापेक्षा लेखणीला महत्त्वाचे मानले. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन काम करणे हे ज्याने आपले उद्दिष्ट ठेवले होते ते म्हणजे कराडचे पत्रकार शंकरराव पाटील अर्थात बापू.  

शंकर पाटलांच्याकडे बघितले तर पायजमा पांढरा, सदरा पांढरा, डोक्यावर टोपी पांढरी, दिसायला ग्रामिण भागातील. हातात काळी बॅग असा एखादा माणूस दिसणे आणि तो पत्रकार असणे आत्ताच्या कालखंडात दुरापास्तच आहे आणि हे शिवधनुष्य शंकर पाटील यांनी लीलया पेलले आहे.  

अनेक वर्षापूर्वी त्यांची माझी भेट ग्रामोध्दारकार रा. बा. ऊर्फ भाऊसाहेब जाधव यांच्या मोती चौकातील दैनिक ग्रामोध्दारच्या कार्यालयात झाली. भाऊसाहेब जाधव व बापुसाहेब जाधव यांनी करुन दिलेली ओळख कधी कौटुंबिक जिव्हाळ्यात झाली ते कळलेच नाही. तेंव्हापासून आत्तापर्यंतचा कालखंड सगळं माझ्या नजरेसमोर एकामागून एक दिसू लागलं.

पत्रकारितेचा वारसा शंकर पाटील यांनी आपले वडील  सखाराम बहिर्जी उर्फ स. ब. पाटील यांच्याकडून घेतला. ते सातारा व कराड येथून शिक्षकांचा कैवारी आणि अलंकार या मासिकाद्वारे समाज प्रबोधनाचे काम करीत होते.  शिक्षकांचा कैवारी हे मासिक १९३२ पासून ते १९४४ पर्यंत सुरू होते.

त्याचबरोबर त्यांनी १९३६ पासून अलंकार हे मासिक सुरू केले. या मासिकाचे सहसंपादक म्हणून सातारचे माजी आमदार , डाव्या विचारसरणीचे झुंजार नेते ज्येष्ठ कायदा तज्ञ एडवोकेट व्ही. एन. पाटील होते. म्हणजे पहिल्यापासूनच शंकरराव पाटील यांच्यावर वडील तसेच त्यांचे सहकारी असलेले एडवोकेट पाटील यांच्या डाव्या विचारांचा प्रभाव होता. 

शंकर पाटील यांचे शिक्षण व्ही. एन. पाटील यांच्या कृपाछत्राखाली आणि रयत शिक्षण संस्थेच्या धनिणीच्या बागेत कमवा आणि शिका योजनेअंतर्गत झाले. इंटरपर्यंत शिक्षण घेतलेले शंकरराव यांचा विवाह हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुढाकाराने झाला.

विशेष म्हणजे शंकर पाटील पती-पत्नी दोघेही शेतकरी कामगार पक्ष व लालबावटा च्या झेंड्याखाली सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मातोश्री स्मृतीशेष शारदाबाई व त्यांचे वडील स्मृतीशेष गोविंदराव पवार या उभयतांच्या सल्ल्यानुसार व फलटणचे माजी आमदार आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राहिलेले शिवसंदेशकार स्मृतीशेष हरिभाऊ निंबाळकर, बेळगावचे  कृष्णा मेणसे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गोवा मुक्ती संग्राम व सीमा लढ्यात सहभाग घेतला होता. 

विशेष म्हणजे पोर्तुगीज राजवटीतील पोलिसांच्या मारहाणीत शंकर पाटील गंभीर जायबंदी झाले होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग दिला होता. आपली पत्रकारिता ही केवळ बातम्यांंपुरती मर्यादित न ठेवता आपल्या विचाराने बांधील असलेल्या दिशेकडे जाण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा उपयोग समाजासाठी करून दिला हे त्यांचे आणखी एक विशेष.

पत्रकार म्हणून शंकर पाटील यांनी १९५७ ते १९६५ या कालावधीत आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा आणि वा. रा. कोठारी यांच्या दैनिक प्रभात साठी  वार्तांकन सुरू केले. तेव्हापासून खरेतर ते पत्रकार म्हणून उदयास आले. काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या शिदोरी मध्ये १९६७ ते १९७२ या कालावधीत ते संपादकीय विभागात काम करत होते.

त्याचबरोबर त्यांनी ब्लिटझ या बहुभाषिक साप्ताहिकासाठी सुद्धा लिखाण केलेले आहे. त्यांचे त्यातील लिखाण आणि कव्हरस्टोरी एवढ्या गाजल्या की शंकर पाटील यांनी आपल्या पत्रकारितेचा दबदबा खऱ्या अर्थाने निर्माण केला. 

समाज जागृतीसाठी आणि न्याय बुद्धीने लिहिलेल्या वार्तांकनामुळे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झालेले आहेत. याची नोंद वाळवा तालुक्यातील कासेगाव तसेच कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. परंतु आपली न्याय बुद्धीची पत्रकारिता त्यांनी या हल्ल्यानंतरही तसूभर देखील ढळू दिली नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचे व न्यायाचे असेच लिखाण त्यांनी आपल्या लेखणीतून केले हे त्याचे विशेष आहे.

अतिशय साधे व्यक्तिमत्व असलेले शंकर पाटील उर्फ बापू खरंतर आमच्या पिढीच्या अगोदरच्या पिढीचे मात्र आमच्याबरोबर सुद्धा त्यांचे बरोबरीचे असल्यासारखेच संबंध आहेत. शिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ , बापूसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे काम सुरू असताना त्यांनी कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, अखिल भारतीय स्तरावरील मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. कराड तालुका पत्रकार संघाचे नेतृत्वही त्यांनी केले. 

अतिशय साधा सरळ मार्गी असलेला असा पत्रकार सापडणे सध्या दुरापास्त झाले आहे. 

विचाराने पक्का असलेला अशा पत्रकाराचे भांडवल काय तर  भरपूर चालणे, वाचन करणे आणि गांधीवादी तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वारसा चालवणे. हे आजही ८५ व्या वर्षी असलेले शंकर पाटील खरंतर आपल्या सर्वांचे बापू आहेत आणि या बापूंना ८५ व्या वर्षानिमित्त मी व्यक्तिशः आणि माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक सदिच्छा देतो.

त्यांचे असेच आशीर्वाद पुढच्या पिढीवर रहावेत. पत्रकारितेवर आलेले मळभ दूर करण्यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शक असे दिपस्तंभ असलेले व्यक्तिमत्व आशीर्वादासाठी सदैव हवेच. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या वतीने शंकर पाटील यांच्या नावाने दरवर्षी पत्रकार दिनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृत्यर्थ, धाडसी पत्रकारीता पुरस्कार दिला जातो हे योग्यच आहे. 

- विजय मांडके, सातारा.९८२२६५३५५८

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या