सुशांत सिंह प्रकरणाचे भांडवल करून रचलेल्या कुटील कारस्थानाचा पर्दाफाश
Sushant Singh News : अभिनेता सुशांत सिंह राजपुत प्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी या काळात सोशल मीडियावर थोडथोडकी नव्हे, तर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् उघडण्यात आली होती.
या अकाऊंटस् च्या माध्यमातून पोलिसांच्या बदनामीची मोहीम अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने चालवली गेल्याचे कुटील कारस्थान सायबर क्राईम विभागाने उघडकीस आणले आहे.
सुशांत सिंहच्या आत्महत्येला जवळपास साडेतीन महिने होऊन गेले आहेत. मात्र राजकारणाने पछाडलेल्या मनोवृत्तीतून याप्रकरणी नंगानाच सुरू ठेवण्यात आला. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून घेण्यात आला.
तपासाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र
मुंबई पोलिसांकडून सनदशीर पध्दतीने सुशांत सिंह प्रकरणाचा तपास केला जात असताना त्या तपासाला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये या हजारो फेक अकाऊंटस् च्या माध्यमातून मुंबई पोलीस, राज्य सरकारची बदनामी होईल अशा पध्दतीच्या पोस्ट कशा शेअर करण्यात आल्या यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत शंका निर्माण होईल अशा पोस्ट टाकून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला, राज्य सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होते. त्याचा पर्दाफाश या अहवालाच्य माध्यमातून करण्यात आला आहे.
नामानिराळे राहण्याचा आणला आव
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर केलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नव्हेत, तर इटली, जपान, पोलंड, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही हाताळण्यात आली आहेत.
परदेशातून हाताळण्यात आलेल्या अकाऊंटस् वरून या संदर्भातील पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत, त्याबाबत नामानिराळे राहण्याचा आव आणला जात होता.
परंतु अशा सर्व अकाऊंटस् च्या बाबतीत वापरण्यात आलेले ‘जस्टिसफॉरसुशांत’, ‘सुशांतसिंहराजपुत’, ‘एसएसआर’ हॅशटॅग हा समान धागा आढळून आला. त्यामुळे हे एक नियोजनबध्द षडयंत्र असल्याचे स्पष्ट झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने यासंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितले.
सरकार कोरोनाच्या लढाईत गुंतले असताना, या संकटात असंख्य पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असताना, कित्येकांना कर्तव्य बजावताना जीव गमवावे लागले असताना अशा प्रकारचे हीन राजकारण कोणी केले हे उघड गुपित आहे.
प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने मोहीम
मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली हेच या अहवालातून उघड झाले आहे.
सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्या नसून खूनच असल्याचे चित्र रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. परंतु ही आत्महत्याच होती यावर एम्सच्या अहवालाने शिक्कामोर्तब केल्याने अशा प्रवृत्तींना जबरदस्त चपराक बसली आहे.
त्याच पध्दतीने या प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास हा योग्यच होता हे सत्यही बावणकशी सोन्याप्रमाणे झळाळून वर आले आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर सेलच्या अहवालावरून संबंधितांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. हा एकप्रकारे महाराष्ट्रद्रोह असून याबद्दल संबंधितांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे त्यांनी सुनावले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या