Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले दुर्मिळ सोनेरी बेडूक


दुर्गम भागातील धबधब्यावर प्रजातीचे अस्तित्व; ‘सह्याद्री’त प्रथमच नोंद

Satara News : पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अभ्यास दौऱ्यावर असताना अतिशय दुर्गम भागातील एका धबधब्यावर प्रथमच दुर्मिळ अशा सोनेरी बेडकाचे अस्तित्व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व हेमंत केंजळे यांना आढळून आले आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दहा वर्षीय आराखडा अद्यावत होणार आहे. त्यासाठी वन्यजीव विभागाने कोयना व चांदोली क्षेत्रातील प्रदेशनिष्ठ वनस्पती, वन्यजीव तसेच इतर जैवविविधता यांचा आढावा व शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. 

त्यादृष्टीने या व्याघ्र प्रकल्पाचा पुढील दहा वर्षीय आराखडा परिपूर्ण असावा यासाठी क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल गोविंद लेंगुटे यांनी पुढाकार घेऊन हे काम सुरू केले आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या पहिल्या पाहणी दौऱ्यात रोहन भाटे व हेमंत केंजळे यांना या दुर्मिळ प्रजातीचे दर्शन झाले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वारणा कोयना या नद्या प्रवाहित होतात. वारणा नदीचा उगम तर चांदोली राष्ट्रीय उद्यानातूनच होतो. या दोन्ही नद्यांवर चांदोली व कोयना धरण बांधण्यात आले आहे. या व्याघ्र प्रकल्पात तीव्र उतार व उच्च प्रवाह असलेले अनेक लहानमोठे धबधबे आहेत. त्यापैकीच अतिशय दुर्गम भागातील एका धबधब्यावर या प्रजातीचे अस्तित्व आढळून आले.

अस्तित्व केवळ पश्चिम घाटातच

या प्रजातीवर, त्याच्या प्रजनन व इतर शास्त्रीय माहितीवर फारसा अभ्यास झालेला नाही. त्याविषयी अत्यल्प प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. हा बेडूक प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच जगात ही प्रजाती फक्त पश्चिम घाटातच आढळते. यापूर्वी याची नोंद सिंधुदुर्ग व आंबोली येथे झाली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उच्च व तीव्र उतार तसेच खडकाळ प्रवाह असलेल्या काही दुर्गम भागातील धबधब्यावर या बेडकांचे अस्तित्व आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ही बेडूक प्रजाती प्रथमच नोंद झाली असून व्याघ्र प्रकल्पासाठी ही नोंद अभिमानाची बाब आहे.

शास्त्रीय नाव 'इंडोसिल्व्हिराना सीझरी'

उभयचर प्राणी म्हणजे भूमी आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकणारा प्राणी. ऑगस्ट २०१२ साली भारतातील लुप्त झालेले उभयचर प्राणी यांच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचे मोठे कार्य महाराष्ट्र शासन वनविभाग, आययुसीएन, सांचुरी एशिया यांनी संयुक्तपणे कोयनानगर येथून सुरु केले. 

दिल्ली विद्यापीठातील डॉ. बिजू दास व त्यांचे सहकारी यांनी २०१४ साली भारतातील सात नवीन लुप्त उभयचर बेडूक प्रजातींचे शोध लावले होते. त्यामध्ये हा बेडूक प्रथम सिंधुदुर्ग येथे सापडला होता. 

२०१२ सालापासून सुरु झालेल्या या कार्यात डॉ. सीझर सेनगुप्ता यांचीही महत्वाची भूमिका होती. ते प्रसिध्द रोगनिदान तज्ञ (पॅथोलॉजिस्ट) व थायरॉकेअर लॅबचे उपाध्यक्ष आहेत तसेच आघाडीचे वन्यजीव छायाचित्रकार म्हणूनही ख्यातकीर्त आहेत. 

त्यांच्या सन्मानार्थ २०१४ मध्ये सिंधुदुर्ग येथे नव्याने सापडलेल्या या बेडूक प्रजातीस ‘इंडोसिल्व्हिराना सीझरी’ हे शास्त्रीय नाव देण्यात आले. तर बोली भाषेत ‘महाराष्ट्र सोनेरी पाठीचा बेडूक’ असे नाव दिले गेले.

सह्याद्रीचे जंगल म्हणजे फुफ्फुस 

सह्याद्री हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे महत्वाचे स्थान ठरले आहे. लवकरच लुप्त होण्याचा धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी व इतर प्रजाती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. या प्रदेशात अनेकमोठे जलसाठे, नद्यांचे उगम तर आहेतच, शिवाय येथील संरक्षित अमूल्य, अद्वितीय पर्यावरण प्रणाली महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया आहे. शुध्द हवा व शुध्द पाणी यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फुफ्फुस आहेत, तर या जंगलांमुळेच आपले पाण्याचे स्त्रोत शाबूत राहतील. यावरूनच या जंगल परिसराचे महत्व अधोरेखित होते. माणसाचे जीवन निसर्गावरच अवलंबून आहे. आपण सर्वांनी त्याचे संवर्धन करायला पाहिजे.

- रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या