चार - पाच दिवसातच होणार जिल्हावासीयांच्या सेवेत रूजू : पालकमंत्री
Satara News : सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात येत असलेल्या कोविड हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज या कामाची पाहणी केली.
कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी राज्य शासनाबरोबर स्वयंसेवक, उद्योगांनी मदत केली आहे. अशा या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन ९ तारखेच्या दरम्यान होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
या पाहणीप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
उर्वरित कामे तातडीने पूर्ण करुन हे कोविड हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी लवकरात लवकर खुले करण्याच्या सूचना रामराजे यांनी यावेळी केल्या.
शासनाने केले सर्वतोपरी सहकार्य
राज्यात काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या दृष्टीने जिल्ह्याच्या ठिकाणी एक कोरोना हॉस्पिटल असावे अशी सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार राज्य शासनाने छत्रपती शिवाजी संग्रहालयात कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी मान्यता देवून सर्व ते सहकार्य केले.
या हॉस्पिटलमध्ये २३४ ऑक्सिजन बेड व ५२ आयसीयू बेड असणार आहेत. डायलिसीसच्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत, अशा रुग्णांसाठीही ४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
बांधकाम व विद्युत सुविधेसाठी ५ कोटी ९२ लाख ७० हजार, वैद्यकीय उपकरणांसाठी ६ कोटी ८४ लाख ९७ हजार ६१ रुपये तर मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी ६ महिन्यांसाठी १३ कोटी ९९ लाख ३२ हजार इतका खर्च करण्यात आला आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझमा दान करावे
जिल्ह्यातील बरेच कोरोना बाधित रुग्ण आज बरे होवून घरी गेले आहेत. या रुग्णांमध्ये कोरोना विषाणुपासून लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. या अँटिबॉडीज प्लाझमाच्या उपचार पद्धतीने गंभीर कोरोना बाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लाझमा दान करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले. तसेच मीही कोरोनातून बरा झालो असून मी ही प्लाझमा दान करायची इच्छा जाहीर केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मकरंद पाटीलही प्लाझमा दान करणार
मलाही कारोना संसर्ग झाला होता. आज मी पूर्णपणे बरा झालो आहे. नागरिकांनी कोरोनाविषयी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्लाझमा दान करावे. मीही प्लाझमा दान करणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी कोविड हॉस्पिटलच्या पाहणीप्रसंगी सांगितले.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या