गांधी जयंतीदिनी सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे लोकार्पण
Satara News : वर्धा - महात्मा गांधी एक विचार आहे. ‘खेड्याकडे चला’ या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आज आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांची ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले.
महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या सप्ताहनिमित्ताने सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजीत कांबळे, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि विनोबा भावे यांना अभिवादन करुन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, काळाला आपल्या कामातून दखल घ्यायला लावणारी थोर व्यक्तिमत्त्वेच महात्मा होतात. सेवाग्राम येथून स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. तेव्हा तंत्रज्ञानही नव्हते, पारंतत्र्य असल्यामुळे सर्व बाजुंनी बंधने होती. प्रसाराची कोणतीही साधने नसतानाही स्वातंत्र्य संग्रामाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. एखाद्या ठिकाणी गांधीजी जाणार असे कळल्यानंतर नागरिकांची तिथे प्रचंड गर्दी व्हायची, हे आजोबांनी सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी विशद केली. गांधीजींना ऐकायला, पाहायला जनसागर उसळायचा, हे भाग्य मागून मिळत नाही तर कमवावे लागते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा
स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग फुंकले तसेच चळवळीची बीजे रुजली तो सेवाग्राम आश्रम जगभरातील गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण व्हावे, यादृष्टीने आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू
शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो, हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या आश्रमाला लवकरच भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तत्वहीन राजकारण, चारित्र्याशिवाय शिक्षण, कष्टाशिवाय पैसा, नीतीशुन्य व्यवहार, त्यागाशिवाय उपासना, मानवतेशिवाय शास्त्र, विवेकरहित आनंद या महात्मा गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापांची संकल्पनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विशद केली.
सेवाग्राम येथील विकासकामांचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे त्याची जपणूक करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. स्मारकाच्या जपणुकीसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची नितांत सुंदर स्क्ल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कुलचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.
पावित्र्य जपले जावे - अजित पवार
सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे. सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाची कामे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी झाडे लावण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होईल
इंडस्ट्रीयल आणि मोटार वाहनांच्या स्क्रॅपचा वापर करुन जगातील पहिले असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे अनुक्रमे 31 आणि 19 फूट ऊंचीचे स्कल्पचर उभारण्यात आले आहेत. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महात्मा गांधी यांचे सेवाग्राम येथील वास्तव्य आणि येथून झालेल्या स्वातंत्र्य चळवळीबाबत तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातील झालेल्या कामांवर आधारीत तयार केलेल्या चित्रफिती उपस्थितांना दाखविण्यात आल्या.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या