Satara News : दादासाहेब घार्गे - एक दीपस्तंभ लुप्त झाला...


Satara News : 
खटाव तालुक्यातील गोपुजचे सुपुत्र, निवृत्त उपजिल्हाधिकारी, म्हाडाचे निवृत्त सचिव लक्ष्मणराव रंगराव घार्गे उर्फ दादासाहेब यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी किडनीच्या आजाराचे निमित्त होऊन बारामती येथे नुकतेच निधन झाले. त्यांची सर्वात धाकटी आणि लाडकी कन्या डॉ. कीर्ती सतीश पवार हिने शर्थीने प्रयत्न केले. परंतु त्याला त्यांच्या वयोमानानुसार पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांची प्राणज्योत मालवली. यानिमित्ताने...

शेवटचे काही दिवस वगळता दादासाहेबांची सर्व ज्ञानेंद्रिये उत्तम होती. डोळ्यांना चष्मा सोडला तर डोक्यावरील काळेभोर केस, सशक्त दंतपंक्ती यांची साथ त्यांना अगदी या वयापर्यंत लाभली. यामुळे ते नव्वदीत पोहोचले हे सांगूनही पटायचे नाही.

वाढत्या वयाबरोबर केवळ शरीर थकत नाही तर मनही थकत असते. दादासाहेब याला अपवाद होते. तल्लख स्मरणशक्ती, पूर्वग्रह विरहित स्वभाव, जिज्ञासू वृत्ती यांच्या जोडीला अत्यंत समर्पक संभाषण कौशल्य यामुळे इतर वृद्ध व्यक्तीप्रमाणे कौटुंबिक वर्तुळात आऊटडेटेड न होता सतत रिलेवंट राहिले. त्यासाठी कसलाही वेगळा प्रयत्न करावा न लागता. आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचे अद्ययावत ज्ञान आणि मुळातील विवेकी, उदारमतवादी दृष्टिकोन यातून ते कुठल्याही वयाच्या, स्तरातील व्यक्तीशी उत्तम संवाद साधत. त्यांच्या संपर्काची अशी अनेक वर्तुळे एकाच वेळी गुण्या गोविंदाने समांतर अशी अखेरपर्यंत नांदत होती. जगण्याचे नेमके प्रयोजन त्यांना ठाऊक होते. त्यामुळे कसलाही वैचारिक गोंधळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नव्हता. याच सामथ्र्यावर ते अखेरपर्यंत कार्यरत होते.

व्यक्तिमत्वातील पैलूंमधून संस्कारांची प्रचिती 

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ज्यातून त्यांच्यावरील विविध संस्कारांची प्रचिती यायची. त्यांचे शिक्षण परिस्थिती नुरूप वेगवेगळ्या ठिकाणी झाली. गोपुज, रहिमतपूर, कोल्हापूर, मुंबई येथे त्यात चढत्या श्रेणीने त्यात उत्तरोत्तर प्रगती होत राहिली. ते नक्कीच हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात असणार. पण म्हणून त्यांनी अभ्यासाचा बागुलबुवा दाखवून समकालीन परिस्थितीचे अवलोकन करायचे टाळले नाही. त्यांना कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये प्रख्यात व विद्वान प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. त्यातून त्यांची जीवनदृष्टी आणखी विशाल बनली. विद्याभ्यासाच्या तत्कालीन सर्वच व्यक्तींविषयी त्यांना अपार कृतज्ञता वाटायची.

भारतास नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि सर्व देशभर वातावरण कसे भारलेले होते. त्यांना महसूल विभागात नोकरीची संधी मिळाली आणि त्यांच्या प्रदीर्घ व्यावसायिक कारकीर्दीचा आरंभ झाला. पुढे पदोन्नतीने मुंबईत डेप्युटी कलेक्टर, म्हाडाचे जवळपास १० वर्षे सचिव असा निवृत्तीपर्यंत प्रवास झाला. ही सर्वच कारकीर्द त्यांनी सर्व सहकारी, ज्येष्ठ, कनिष्ठ यांच्याशी सुसंवाद साधत अत्यंत कुशलतेने आणि जबाबदारीने पार पाडली. निवृत्तीनंतरही त्या काळातील आपुलकीचे जुने स्नेहबंध जपले.

एका आदर्श सहजीवनाचा दीपस्तंभ

व्यक्तिगत आयुष्यात सौ. शांताताई यांच्यासमवेत जवळपास ६५ वर्षांचे सहजीवन ते अत्यंत उत्कट, तृप्त भावनेने जगले. राजाराम कॉलेजपासूनच ते एकमेकांशी परिचित होते. ते मैत्र त्यांनी अत्यंत संयमाने जपले. शेवटपर्यंत आग्रही स्वभावाच्या तार्इंच्या स्वभावाला त्यांनी खेळकर वृत्तीने हाताळले. सात मुलींचे कुटुंब. सर्वांवर उत्तम संस्कार तर केलेच, पण एका आदर्श सहजीवनाचा दीपस्तंभ दोघांनी आपल्या दैनंदिन आचरणाने त्यांच्यासमोर ठेवला. 

प्रत्येकीला तिला अनुकूल ठरेल असे शिक्षण आणि विवाहासाठी कौटुंबिक संबंध त्यांनी जाणीवपूर्वक निवडले. त्यांच्या विवाहपूर्व आणि विवाहोत्तर आयुष्यात दोघेही अखेरपर्यंत उत्तम संवादक, मार्गदर्शक म्हणून खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक व्याही, जावई व इतर कुटुंबीय यांच्याशी दादासाहेबांनी आपल्या उत्कट तरीही मर्यादशील वागण्याने नात्यांचा उत्तम गोफ विणला. 

निवृत्तीनंतर जवळपास ३० वर्षे त्यांनी समृद्ध सामाजिक आयुष्य जगले. आधी सोलापूर, नंतर कराड येथे ते ‘मी माझ्यापुरता’ असे न जगता तेथील विविध सामाजिक उपक्रमांत स्वेच्छेने सहभागी झाले. जेथे गरज आहे तेथे त्यांना त्यांनी उत्तम दिशा दिली, त्यांना अधिक कार्यप्रवण केले. ग्राहक संरक्षण कायदा, सेवानिवृत्त व्यक्तींचे प्रश्न यासाठी मोठे योगदान दिले. 

गावच्या शाळेसाठी भूदान

आपल्या जन्मभूमीत, गोपुज येथील महादेव मंदिराचा जीर्णोध्दार करण्यासाठी त्यांनी ८३ - ८४ मध्ये पुढाकार घेतला होता. तेथील हायस्कूलला अपुरी जागा होती. मुलांना पुरेशा सुविधा मिळू शकत नव्हत्या. यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी स्वत:ची दोन एकर जमीन तर दिलीच, पण त्यावर न थांबता शाळेला उत्तम इमारत व्हावी म्हणून स्वत: पुढाकार घेऊन मोठा आर्थिक निधी उपलब्ध करून दिला. त्याच्या व्यवस्थापनात लक्ष घातले. वयाच्या ८० - ८५ च्या घरात असताना त्यांनी हा ध्यास घेतला आणि पूर्ण केला. 

गोपुज येथील आमच्या विठोजी बहिर्जी यांनी १८६० - ७० च्या आसपास बांधलेल्या चिरेबंदी वाड्यात आम्ही अगदी शेंबड्या वयापासून त्यांचा प्रासंगिक वावर पाहिला. सफारी ड्रेसमधील रुबाबदार दादासाहेब सर्वांची अत्यंत जिव्हाळ्याने, आपुलकीने विचारपूस करायचे. त्यांची वृद्ध आई आक्का, मधल्या उमा आजी, पलीकडील काकी यांच्यानंतर माझे वडील दादा मास्तर, सर्जेराव काका, काका भाऊ, विनायक भाऊ, दत्तू अण्णा या भावंडांशी अकृत्रिम जिव्हाळ्याने त्यांचा संवाद चाले. गेल्या वीस - पंचवीस वर्षात काहीजण वयोमानानुसार निवर्तले. त्यांच्या कुटुंबीयांना ते आवर्जून भेटायचे. शक्य होईल तसे कुटुंबातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. मुलांनी शैक्षणिक यश मिळवले तर मोकळेपणाने कौतुक करायचे. दरवर्षी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेत न चुकता हजेरी लावायचे. हा रिवाज त्यांनी अखेरपर्यंत जपला होता.

बहिणी, कनिष्ठ बंधूंवर फार जीव

आपल्या सर्व बहिणी व कनिष्ठ बंधू मानसिंग मामा यांच्यावर त्यांचा फार जीव. रहिमतपूर येथे बाई आत्याकडे काही काळ शिक्षणासाठी होते. त्याविषयी ते कायम कृतज्ञ राहिले. मानसिंग मामांची तब्येत काही वर्षे बरी नाही. त्यासाठी ते दर महिन्यात धावपळ करून भेटायला येत. दादासाहेब घरी आल्यावर मामांना काय करू नी काय नको असे व्हायचे. त्यांचा एकमेकांशी कधी फार संवाद झाला आहे असे आठवत नाही. पण तो संवाद कदाचित अव्यक्त पण अत्यंत गहिरा होता. 

आपल्या सर्व मुलींविषयी त्यांना सार्थ अभिमान होता. त्यांना जेव्हा त्यांची गरज असेल तेव्हा ते हातातील कामे बाजूला सारून उपलब्ध रहात. त्यांना समर्पक सल्ला देत. कौटुंबिक सौख्य अतूट राहील असा विश्वास देत. सर्वच जावई, नातवंडे, त्यांची मुले यांची वृथा नाही पण योग्य काळजी घेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करत. पण त्यात आग्रही हट्टीपणा नसे. त्यामुळे ते सर्वांनाच अखेरपर्यंत प्रिय राहिले.

अधिकारपदे भूषवली, पण अहंकार नव्हता

दादासाहेब नेहमीच वर्तमान काळात जगले. अर्थात त्यांना भविष्य कळत नव्हते असे नाही. पण त्यामागे ते कधीच भरकटत गेले नाहीत. त्यांच्यात प्रचंड संयम, सौजन्यशीलता होतीच, त्याच्या जोडीला वास्तव अशी दुर्दम्य इच्छाशक्ती होती. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत ते डगमगले नाहीत. मोठी अधिकार पदे भूषवली तरीही अहंकाराचा वारा शिवला नाही. आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले तरी नम्रता सोडली नाही. त्यांना आपल्या क्षमतेविषयी सार्थ अभिमान होता, पण तो दुराग्रही नव्हता. ते अत्यंत संपन्न आणि कृतार्थ आयुष्य जगले. अपेक्षित ते सर्व त्यांना लाभले अशी त्यांची भावना असणार. कारण नाही त्या गोष्टींचा ध्यास त्यांनी कधीच घेतला नाही. 

गोपुज ग्रामस्थांच्या वतीने त्यांना दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला पहिला ‘आदर्श नागरिक पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवता आले याचा सार्थ आनंद आणि समाधान आम्हाला लाभले. गोपुजकर ग्रामस्थ, दादासाहेबांच्या सर्व मुली, जावई यांच्या उपस्थितीत दत्तप्रसाद दाभोलकर यांच्यासारख्या ज्ञानी, विवेकी समाज चिंतकाच्या हस्ते हा गौरव झाला हेही एक अहोभाग्य.

समृद्ध वारसा अधिक समृद्ध करायचाय

अधून मधून फोनवर त्यांच्याशी संवाद व्हायचा. गेल्या दोन महिन्यापूर्वी औरंगाबाद येथे रवीच्या आकस्मिक निधनानंतर उत्तरकार्य आटोपून परत येत असताना त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. इच्छा असूनही मला त्यांना आमच्या नवीन सुरू झालेल्या शिराळा प्रकल्पात नेता आले नाही ही हूरहूर त्यांच्या निधनाने कायम राहणार. 

त्यांचं अनुभवसंपन्न संतुलित आणि हक्काचे मार्गदर्शन आता यापुढे उपलब्ध नसणार. यामुळे अधिक जबाबदारीने राहावे लागणार. त्यांचा हा समृद्ध वारसा अधिक समृद्ध करणे ही आमच्यावर असलेली मोठी जबाबदारी आहे असे मी समजतो. त्याला पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच त्यांना सार्थ श्रद्धांजली !

- प्रताप देशमुख (गोपूज / पुणे)

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या