महावितरणची आर्थिक कोंडी; बिले न भरल्यास स्थिती होणार आणखी गंभीर
Mahavitaran News : सातारा जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत २४७ कोटी ४२ लाख रुपयांनी वाढ झाली असून सद्यस्थितीत ५ लाख ३० हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहकांकडे तब्बल ९९४ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकीमध्ये मोठी वाढ होत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक आहे. ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा त्वरित न केल्यास हे आर्थिक संकट आणखीनच गडद होत जाणार आहे.
कोरोनाच्या संकटापूर्वी मार्चपर्यंत सातारा जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील ३ लाख ४८ हजार वीजग्राहकांकडे ७४७ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी होत गेल्याने महावितरणच्या आर्थिक संकटाला सुरूवात झाली आहे.
थकबाकी ९८.६० कोटींनी वाढली
मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत १.७५ लाखांनी वाढ झाली असून थकबाकीची रक्कमदेखील तब्बल ९८ कोटी ६० लाखांनी वाढली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ लाख ४४ हजार २०० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १२१ कोटी ४१ लाख रुपयांची तसेच कृषिपंप व इतर अशा १ लाख ८६ हजार ग्राहकांकडे ८७३ कोटी ९ लाख असे एकूण ५ लाख ३० हजार ग्राहकांकडे ९९४ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे ?
वाढत्या थकबाकीच्या पाश्र्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते.
‘अनलॉक’मुळे वाणिज्यिक वापर, रब्बी हंगाम व सणासुदीचे दिवस, औद्योगिक उत्पादन आदिंमुळे या महिन्यापासून वीजमागणीत मोठी वाढ होत जाणार आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर उभा ठाकणार आहे.
कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीच्या प्रतिकूल परिस्थितीत महावितरणकडून अहोरात्र ग्राहकसेवा दिली जात आहे. महावितरणच्या या गंभीर आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या