लस कधी यायची तेव्हा येवो, स्वत:ला संसर्गापासून दूर ठेवूया - उध्दव ठाकरे
Satara News : कोरोनाची लस कधी यायची तेव्हा येवो, पण मास्क वापरणे, हात धुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपण स्वत:ला कोविडच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला या संकटावर मात करण्यासाठी उमेद दिली.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभ्या असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य आपण करत आहोत, हे निश्चितच अभिमानास्पद असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
यावेळी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार (ऑनलाईन), विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे (ऑनलाईन), सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिक सजग राहून काम करा
जगभरातील देशात लाट ओसरली ओसरली म्हणता म्हणता कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहून काम करावे लागेल, असे दिशादर्शन उध्दव ठाकरे यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात एक सुसज्ज कोविड हॉस्पिटल असावे अशी सर्वांचीच इच्छा होती त्या इच्छेची पूर्ती होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जंबो कोविड हॉस्पिटल उभे केल्यानंतर जबाबदारीही तेवढीच मोठी असल्याची जाणीव त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला करून दिली.
लाखापुढील बिलांवर लक्ष ठेवा !
खाजगी हॉस्पिटलच्या एक लाखाच्या पुढच्या बिलाचे ऑडिट करावे, त्यावर लक्ष ठेवून राहा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनेसाठी पुणे विभागाला १५१ कोटी दिले असून पाच जिल्ह्यांपैकी सातारा जिल्ह्याला ४५.५९ कोटी रुपये दिल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
अधिकाधिक ट्रेसिंग करणे गरजेचे
हॉस्पिटल सुरु होईल, सर्व साधनांची पूर्तताही होईल. पण डॉक्टर आणि नर्सेस यांची सेवा अधिक गतीने होण्याची गरज आहे. मृत्यूदर कमी करण्याबरोबर अधिकाधिक ट्रेसिंग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले. यावेळी रामराजे नाईक - निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई यांचीही भाषणे झाली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या हॉस्पिटलची उभारणी, त्यात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, यासाठी लागलेला निधी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कोविड हॉस्पिटलवर बनवलेली चित्रफीत दाखविण्यात आली.
यावेळी हे हॉस्पिटल उभे करण्यासाठी सहकार्य केलेल्या जिल्ह्यातील आणि बाहेरील संस्था आणि व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा गौरव करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आभार मानले.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या