अत्यंत देखणे, सुसज्ज रूग्णालय सोमवारपासून कोरोना रूग्णांच्या सेवेत होणार दाखल
Satara News : सातारा जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या सातारच्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या लोकार्पणाची घडी समीप आली आहे. या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ९) दुपारी ३.३० वाजता होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर भूषवणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला आणि वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. त्यावेळी जम्बो कोविड हॉस्पिटलच्या मागणीने जोर धरला. या मागणीची दखल घेत सातारा बसस्थानकाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तात्काळ मान्यता दिली.
त्यासाठी आवश्यक असणारा निधीही तातडीने दिला. शिवाय, विविध सेवाभावी संस्थाही या कार्यात ‘खारीचा वाटा’ उचलण्यास पुढे आल्या. आणि अत्यंत कमी कालावधीत सर्व सुविधांनी परिपूर्ण असे कोविड रूग्णालय रूग्णसेवेसाठी सज्ज झाले.
लोकार्पण सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
दरम्यान, या रूग्णालयाचे लोकार्पण केव्हा होणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. तो मुहूर्त निघाला आहे. शुक्रवारी हे उद्घाटन होत आहे.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, मोहनराव कदम, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रशासनातर्फे पत्रकारांसाठी पाहणी दौरा ठेवण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार उपस्थित होते.
नियंत्रण जिल्हा शल्य चिकित्सकांकडे
या हॉस्पिटलमध्ये २३४ ऑक्सिजन बेड व ५२ आयसीयु बेड आहेत. डायलिसीसच्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही ४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग असणार आहे. या रूग्णालयाचे नियंत्रण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे असेल.
जिल्हा रूग्णालयात रुग्णांची तपासणी करुन मग या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. इमर्जन्सी रूग्णांच्या बाबतीत थेट दाखल करण्याची व्यवस्था होणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर प्रत्यक्ष सोमवारपासून हे रूग्णालय कोरोना रूग्णांच्या सेवेत रूजू होणार आहे.
या रूग्णालयासाठी १४ एमडी डॉक्टर्स, १२० परिचारिका तसेच अन्य आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. गेले काही दिवस या ठिकाणी त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.
सातारच्या वैभवात भर घालणारे रूग्णालय
या रूग्णालयाच्या बांधकाम व विद्युत सुविधेसाठी ५ कोटी ९२ लाख ७० हजार, वैद्यकीय उपकरणांसाठी ६ कोटी ८४ लाख ९७ हजार ६१ रुपये, तर मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी ६ महिन्यांसाठी १३ कोटी ९९ लाख ३२ हजार इतका खर्च करण्यात आला आहे. यातून हे सातारा शहराच्या वैभवात भर घालणारे रूग्णालय दिमाखात उभे राहिले आहे.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या