Latest News In Marathi : शासनाचा 'हमी' भाव, व्यापाऱ्यांचा 'कमी' भाव


Latest News In Marathi : हंगाम संपत आला तरी खरेदी केंद्रांचा पत्ता नसल्याने सोयाबीन उत्पादकांचा पाय खोलात

गजानन चेणगे / शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल ३८८० हा हमी भाव जाहीर केला असला तरी अद्याप राज्यात कोठेही सोयाबीन खरेदी केंद्रेच उघडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांकडे जावे लागत असून त्यांच्याकडून त्यापेक्षा कमी भावात सोयाबीन खरेदी केली जात आहे. परिणामी काहीही केले तरी शेतकऱ्यांचा पाय खोलातच आहे.

अलीकडे शेतकरी खरीप हंगामात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. पण गेल्या तीन - चार वर्षात पीक काढणीच्या काळातच पावसाचे वातावरण रहात असल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होत आहे. काढणी झालीच तर मळणीआधीच पाऊस गाठत असल्याने शेतातच पीक भिजून जात आहे. 

साठवणूक करून ठेवण्याची व्यवस्था नाही

त्यातूनही वाचले आणि मळणी होऊन घरी आणले, तर पावसामुळे त्याला ऊन देता येत नसल्याने त्यात आर्द्रता रहात आहे. त्यावर बुरशी येत असल्याने दर मिळत नाही. दर मिळेपर्यंत साठवणूक करून ठेवावे तर शेतकऱ्याकडे तशी व्यवस्था उपलब्ध नाही.

यावेळीही शासनाने सोयाबीनला ३८८० रूपये हमी भाव जाहीर केला. परंतु खरेदी केंद्रे १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सोयाबीन विकण्याची घाई करू नका, खरेदी केंद्रावरच सोयाबीन विका असे आवाहन सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

तथापि, आजअखेर सोयाबीनची अर्धीअधिक सुगी संपली असून दर येईपर्यंत किंबहुना खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत थांबायचे म्हटले तरी ऊनाअभावी वाळवता येत नसल्याने आणि साठवणुकीची सोय नसल्याने व्यापाऱ्यांच्या दारात जाण्याशिवाय शेतकरी वर्गापुढे पर्याय नाही. 

शेतकरी दरातही, आर्द्रतेतही मारला जातोय

आणि व्यापारी या मजबुरीचा फायदा उठवत आहेत. व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीन मागत आहेत. सर्वसाधारणपणे प्रतिक्विंटल ३५०० ते ३७०० रूपयांच्या दरम्यान ही खरेदी सुरू आहे.

शिवाय आर्द्रतेनुसार क्विंटलला पाच - सहा किलो तरी तूट धरली जात आहे. त्यामुळे शेतकरी दरातही मारला जात आहे आणि आर्द्रतेतही मारला जात आहे. 

जादाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने मिळेल त्या भावात सोयाबीनचा 'बाजार' करावा लागत आहे. खरेदी केंद्रे सुरू होईपर्यंत कदाचित बहुतांश शेतकऱ्यांकडील सोयाबीन कवडीमोलाने विकलाही गेला असेल. मग या हमी भावाने खरेदी योजनेचा शेतकऱ्यांना उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या