पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी १७६ मतदान केंद्रे सज्ज
Satara News : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी दि. १ डिसेंबर रोजी संबंधित मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. दोन्ही मतदारसंघात ६६ हजार ७८२ मतदार मतदान करणार आहेत. त्यासाठी १७६ मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे कुणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
शेखर सिंह म्हणाले, निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. दि. ३ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. शिक्षक मतदार संघासाठी ७ हजार ४११ मतदार व ४४ मतदान केंद्रे तर पदवीधर मतदारसंघासाठी ५९ हजार ७१ मतदार व १३२ मतदान केंद्रे आहेत.
निवडणुकीसाठी १ हजार २७६ अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, २ व ३ व इतर कर्मचाऱ्यांची टीम आहे. मतदान केंद्रावर कोविड उपाययोजनेसाठी २०१ आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ५१ क्षेत्रीय अधिकारी, २३१ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. अशा वर्कर्सही सहकार्य करणार आहेत.
आचारसंहिता उल्लंघनाची एक तक्रार
जिल्ह्यात २५ एफएसटी व ११ व्हीएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. केंद्रावर थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, सँनिटायझर, हँडवॉश इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. निवडणूक निरीक्षक नीलिमा केरकट्टा यांनी २० मतदान केंद्रांची पाहणी केली असून दुसरे निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे हे लवकरच दाखल होणार आहेत. आचारसंहिता उल्लंघनाची एक तक्रार दाखल झाली आहे.
मतदारांनी मतदान केंद्रावर येताना मास्क परिधान करावा. मतदारांना सहाय्य करण्यासाठी हेल्पडेस्क उपलब्ध करून दिला जाणार आहे. इतर निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. या निवडणुकीत मतदारांना उमेदवारीसाठीचा १, २, ३ असा पसंतीक्रम मतदान पत्रिकेवर नोंदवावा लागणार आहे. शिक्षक व पदवीधर मतदारांना मतदान यादीत नाव शोधण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/ या लिंकवर यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर येताना विद्यापीठाद्वारे वितरित करण्यात आलेले पदवीधर किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट आदी कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करावी लागणार आहेत, असे शेखर सिंह यांनी सांगितले. यावेळी जिल्हा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, नायब तहसीलदार एन. बी. मोरे आदी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या