मराठ्यांचे कैवारी, स्ट्राँगमॅन असे उल्लेख करत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका
Satara News : स्वत:ला मराठ्यांचे कैवारी, स्ट्राँगमॅन म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे आरक्षणात खोडा घालायचे असे आता चालणार नाही. आम्ही त्यांच्या अनुभवाचा, वयाचा नेहमीच आदर करतो. मात्र मराठा समाजास आरक्षण न मिळण्यास तेच कारणीभूत आहेत, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता केला आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. मराठा समाजाचा आजवर केवळ मतांसाठी वापर करुन या समाजाला झुलवत ठेवण्याचे काम करणाऱ्यांनी निदान आता तरी झालेल्या चुका सुधारण्याची गरज आहे, अशी टीका करून, मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विषय आला की सोयिस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
मराठा समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली, आंदोलने केली, मोर्चे काढले की अन्य समाजांना प्रतिमोर्चे काढायला लावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक अन्य कुणाचे आरक्षण काढून आम्ही आरक्षण मागत नाही. मात्र लोकांच्या डोळ्यात धुळफेक करुन समाजासमाजात वादंग पेटवण्याचे काम काही लोकांकडून होत आहे. मात्र आता मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकारने आरक्षणाबाबत ठोस भूमिका जाहीर करुन तात्काळ आरक्षण द्यावे. अन्यथा लोकांची रिअॅक्शन दिसून येईल, असा इशारा त्यांनी दिला.
फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास न्यायालयात आव्हान देण्यात आले. सध्याच्या सरकारने न्यायालयात याबाबत भूमिका मांडून समाजबांधवांना न्याय देण्याची गरज आहे. मात्र सरकारचा वकीलच न्यायालयात सुनावणीस हजर राहत नाही, असा आरोपही त्यांनी केला. अजुनही फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी त्यांची. त्यासाठी आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करू, असे उदयनराजे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावरुन दुसNयाकडे बोट दाखवायचे उद्योग संबंधितांनी बंद करावेत. आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवून सरकार विविध प्रकारची भरती प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत आहे. ही प्रक्रिया राबवायला आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवूनच निर्णय घ्यावा. विविध प्रकारच्या परीक्षा घेताना मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आरक्षण प्रश्नावर समाजाच्या आमदार - खासदारांनी एकत्र आले पाहिजे. आम्हाला दुसऱ्या कोणाचे नको तर आमच्या हक्काचे आरक्षण द्या, अशी मागणी सर्वांनी धसास लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या