Satara News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री चवणेश्वराची यात्रा रद्द


सासनकाठ्या, भाविकांना बंदी; मानाची लोटांगणेही होणार नाहीत

Satara News : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र चवणेश्वर (ता. कोरेगाव) येथील श्री चवणेश्वराची वार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केली आहे. विविध ठिकाणांहून येणाऱ्या या मानाच्या सासनकाठ्यांना बंदी घालण्यात आली असून भाविकांनाही मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

मानाची लोटांगणेही रद्द करण्यात आली असून परगावच्या भाविक, भक्तांना गावात प्रवेश दिला जाणार नाही. कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम, वाठारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने श्री चवणेश्वराची यात्रा होणार की नाही याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी चवणेश्वर येथे ही बैठक झाली. 

बैठकीस चवणेश्वरचे सरपंच दयानंद शेरे, करंजखोपचे सरपंच लालासाहेब नेवसे, रणदुल्लाबादचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, पोलीस पाटील दादा देशमुख, किरण पवार, गाव कामगार तलाठी राहुल नाळे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. निंबाळकर, पोलीस हवालदार गहिण, सतीश धुमाळ, राजेंद्र धुमाळ, मंदिराचे पुजारी रमेश पवार यांच्यासह वाण्याचीवाडी, गुळुंब, रणदुल्लाबाद, करंजखोप पंचक्रोशीतील मानकरी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संतोष पवार यांनी चवणेश्वर यात्रेची पार्श्वभूमी विषद केली. सध्याच्या परिस्थितीत यात्रा भरवणे उचित ठरणार नाही. प्रशासनावर विनाकारण ताण येणार आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करुन शनिवार (दि. ७) आणि रविवारी (दि. ८) होणारी यात्रा रद्द करुन परंपरेनुसार होणारे धार्मिक विधी मोजक्या लोकांमध्ये करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सर्व रस्त्यांवर बंदोबस्त ठेवणार  

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सासनकाठ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी काही मानकऱ्यांनी केली. तहसीलदार अमोल कदम यांनी चवणेश्वर ग्रामस्थ आणि मानकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मंदिर बंद राहणार असून सासनकाठ्या, मानाची लोटांगणे, छबिना यांना मनाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गावात येणारे सर्व रस्ते, पाऊलवाटांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून ग्रामस्थ सोडून कोणासही गावात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी सांगितले. प्रारंभी सरपंच दयानंद शेरे यांच्या हस्ते अमोल कदम यांचा, तर दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते स्वप्निल घोंगडे याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. उध्दव पवार यांनी सूत्रसंचालन केले. हरीदास शेरे यांनी आभार मानले.

यात्रेत कशाला असणार बंदी ?

  • मंदिर उघडण्यास परवानगी नाही
  • देवाचा छबिना काढता येणार नाही
  • सासनकाठ्यांना मनाई
  • मानाच्या लोटांगणांना मनाई
  • सर्व रस्ते बंद करुन भाविकांना मनाई

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या