दुर्धर आजारामुळे ‘आधार’विना निराधार; देवमाणसांच्या प्रयत्नातून प्रक्रिया पूर्ण
Sangli News : अपंगत्व ७६ टक्के... मात्र दुर्धर आजारामुळे आधारकार्ड निघण्यात अडचणी... त्यामुळे दिव्यांग रुपाली ‘आधार’विना शासकीय योजनांपासून २७ वर्षे वंचित होती. याप्रकरणी शिराळा (जि. सांगली) येथील ज्येष्ठ पत्रकार विकास शहा, तहसीलदार गणेश शिंदे, शिक्षक महादेव देसाई, अब्बास मुरसल आदिंच्या प्रयत्नामुळे जागतिक अपंग दिनी आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रतीक्षा आधारकार्ड येण्याची!
रुपालीचे मूळ गाव मसूद माले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे असून तिचे वडील भगवान सोळसे हे ४५ वर्षांपासून मामाच्या गावी म्हणजे पाडळी येथे वास्तव्यास आहेत. २७ वर्षीय दिव्यांग रुपाली भगवान सोळसे ही जन्मत:च सेरेब्रल पाल्सी व मतिमंद या आजाराने ग्रस्त आहे. तिची उंची फक्त दोन फूट आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तिचे आधारकार्ड काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही.
मतदानाच्या हक्कापासूनही वंचित
आधारकार्ड नसल्याने शासनाच्या कोणत्याही सवलतीचा फायदा मिळाला नाही. मतदार यादीत नाव असुनदेखील ओळखपत्र नसल्याने तिला मतदानाच्या हक्कापासूनही वंचित रहावे लागले. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असतानाही मोलमजुरी करत हे कुटुंब दिव्यांग मुलीला सांभाळण्याचे काम नेटाने करत आहे.
३ डिसेंबर जागतिक अपंग दिनी ज्येष्ठ पत्रकार विकास शहा, तहसीलदार गणेश शिंदे, शिक्षक महादेव देसाई, अब्बास मुरसल, सलवा मुल्ला, परवीन नालबंद, सरपंच सत्यवान पाटील, जिल्हा समन्वयक संदीप पाटील यांच्या प्रयत्नातून या मुलीच्या आधार कार्डाचा तिढा सोडवण्यात यश आले. डोळ्याचे तसेच हाताचे स्कॅनिंग करण्यासाठी जवळपास दोन तास लागले.
अवस्था पाहून नागरिकही द्रवले
यावेळी आधारकार्ड काढण्यासाठी उपस्थित असणाNया अनेक नागरिकांनी या मुलीची अवस्था पाहून थांबून सहकार्य केले. रूपालीच्या डोळ्याचे व हाताचे स्कॅनिंग करण्यासाठी विकास शहा, महादेव देसाई आदी पाच - सहा जणांना खूप कष्ट घ्यावे लागले. ज्यावेळी ही प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळी रूपालीच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आले.
यावेळी मदत करणाNया सर्वांचा शिक्षक महादेव देसाई यांनी फुले देऊन सत्कार केला. आता आधारकार्ड निघेल. त्यामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या असंख्य योजनांचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
प्रयत्न करून थकलो, पण व्यर्थ !
आम्ही आधारकार्ड काढण्यासाठी खूप ठिकाणी हेलपाटे घातले. आमच्या मुलीचे हाताचे ठसे येतात. मात्र डोळ्याचे फोटो काढताना तिचे डोळे बंद होतात किंवा फिरतात. त्यामुळे तिचे आधारकार्ड निघत नव्हते. आम्ही प्रयत्न करून थकलो होतो. मात्र ज्येष्ठ पत्रकार विकास शहा, महादेव देसाई, शासकीय अधिकारी यांच्यामुळे आधारकार्डचे काम झाले. त्यामुळे खूप आनंद झाला आहे.
- भगवान व सुनीता सोळसे
‘सुखायू’ने स्वीकारली जबाबदारी
सांगली येथील सुखायू जन्मजात व्याधी प्रतिबंध व सहाय्य प्रतिष्ठानने रूपालीच्या औषधोपचार आदींची जबाबदारी स्वीकारली आहे. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दीक्षित व उपाध्यक्ष डॉ. नंदिनी पाटील यांनी ही माहिती दिली. आमची संस्था ही जन्मजात व्याधीग्रस्त व्यक्तींच्या सर्वकष विकास व त्यांना आवश्यक उपचार, साधने, समुपदेशन व इतर सुविधा यासाठी कार्यरत आहे. रूपालीची सर्व आरोग्य तपासणी डॉ. रवींद्र व्होरा, डॉ. महेश साळे व डॉ. अनिकेत लिमये हे करणार असून तिला आवश्यक औषधे, कपडे, व्हीलचेअर, किराणा माल व दिव्यांग दाखलाही मिळवून देणार आहे. तसेच रूपालीची आरोग्य तपासणी झाल्यावर तिला आवश्यक व्यायाम आदींची माहिती तिच्या पालकांना देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या