Satara News : लोकसाहित्यासाठी स्वाती चेणगे - बाजारे यांचे योगदान मोलाचे


'हा सागरी किनारा' पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विचार

Satara News : ओव्यांसारखे मौखिक साहित्य काळाच्या ओघात लुप्त होऊन जावू नये म्हणून ते लिहून ठेवणे गरजेचे आहे. स्वाती चेणगे - बाजारे यांनी लोकसाहित्य जपण्यासाठी दिलेले योगदान मौलिक आहे. यापुढेही त्यांनी यासाठी अधिक काम करावे, अशी अपेक्षा सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मसूर (जि. सातारा) येथे बोलताना व्यक्त केली.

लोकसाहित्याच्या अभ्यासक स्वाती चेणगे - बाजारे लिखित 'हा सागरी किनारा' या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त, साहित्यिक अनिल गुंजाळ, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, शिक्षक नेते सिध्देश्वर पुस्तके, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष संगिता साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द ग्रामीण कथाकार बबन पोतदार होते.

‘हा सागरी किनारा’मध्ये समाजमन घडवण्याची ताकद

समाजाला संस्कार देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्याच भूमिकेतून, समाजात चुकीचे चालले असेल तर ते आपण बदलू शकतो ही सकारात्मक बाजू 'हा सागरी किनारा' या पुस्तकाने मांडली आहे. लेखिकेच्या मनातील द्वंद्वाचे गीत म्हणजे हे पुस्तक आहे. या लेखिकेला जिजाऊ, जनाबाई, बहिणाबार्इंचा खूप मोठा वारसा आहे. समाजमन घडवण्याची ताकद या पुस्तकात आहे, असे उद्गार अनिल गुंजाळ यांनी याप्रसंगी काढले.

मानसिंगराव जगदाळे यांनी आपल्या भाषणात गुंफण परिवाराच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. रामचंद्र चेणगे, जानका चेणगे यांचा वारसा समर्थपणे चालवण्याचे काम हा परिवार करत आहे. समाज घडवणाऱ्या परंपरा टिकल्या पाहिजेत. त्यासाठी यापुढेही असे काम होत रहावे असे त्यांनी सांगितले. आजची पिढी खूप बुध्दीमान आहे. त्यांच्यापुढे अशी पुस्तके असली पाहिजेत. कारण हा संस्कारांचा मोठा ठेवा आहे, असे सांगून, मसूरचा साहित्य वारसा जपुया, असे भावनिक आवाहन बबन पोतदार यांनी यावेळी काढले.

महिलांनी या पुस्तकाचे पारायण करावे

स्वाती चेणगे - बाजारे यांनी या पुस्तकात आपले विचार स्पष्ट व परखडपणे मांडले आहेत. त्यांच्या पुस्तकातील ओव्या स्त्रीयांवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आहेत. सासर - माहेरविषयी त्यांनी खूप सुंदर मांडणी केली आहे. भरभरून बोलता येईल इतके हे ग्रेट पुस्तक आहे. त्यामुळे पारायण करायचेच असेल तर महिलांनी या पुस्तकाचे पारायण करावे, असे प्रतिपादन संगिता साळुंखे यांनी यावेळी केले.

जनाबाईला, संत गोरोबांना त्यांच्या कामात विठुमाऊलीने मदत केली, त्याप्रमाणे माझी आई माझ्या हातून लेखन व्हावे म्हणून सतत माझ्या मदतीला आली. वडिलांनीही सतत प्रोत्साहन दिले. आईला शेकडो ओव्या मुखोद्गत होत्या. हा आपला समृध्द वारसा आहे. हे अस्सल मातीतील सोने जपले पाहिजे या भावनेतून पुस्तकाचे लेखन केले आहे, असे सांगत स्वाती चेणगे - बाजारे यांनी लेखनामागील भूमिका विशद केली.

डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविकात गुंफण परिवाराच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द रंगकर्मी सुजित शेख यांनी केले. मानपत्राचे वाचन अनिल जेधे यांनी केले, तर अशोक जगदाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सह्याद्री कारखान्याचे संचालक लहूराज जाधव, लालासाहेब पाटील, बाळासाहेब जगदाळे, मसूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, श्रीकांत जिरंगे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


राज्य शासन साहित्यिकांच्या पाठीशी

महाराष्ट्राला साहित्याची मोठी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण राजकारणी होते, तसे साहित्यिकही होते. राजकारण करत असताना साहित्यिकांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. याच भूमिकेतून राज्य शासन साहित्यिकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. याच कार्यक्रमात गुंफण अकादमीच्या वतीने मानपत्र, स्मृतिचिन्ह व सातारी कंदी पेढ्यांचा हार देऊन बाळासाहेब पाटील यांचा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तमाम मसूरकरांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या