गुन्हा करण्याच्या नव्या स्टाईलचा बुरखा फाडण्याचे पोलीस यंत्रणेपुढे आव्हान
Satara News : तो सातारच्या बाजारपेठेत फिरत आहे. विक्रेत्यांकडून काही खरेदी करून वर त्यांनाच टोप्या घालत आहे. त्याच्या अंगातील पांढऱ्या कोटमुळे लोक फसत आहेत. पांढरा कोट घातलेला माणूस अशी चिंधीगिरी करणार नाही याची लोकांना खात्री वाटते. पण अरेरे... तो टोप्या घालतच असल्याने सातारा शहरात सध्या पांढरा कोट बदनाम होत आहे.
डॉक्टर घालतात तसला पांढरा कोट घालून दिवसाढवळ्या लोकांना गंडा घालत असलेल्या एका भामट्याने गेले आठवडाभर सातारा शहरात खळबळ उडवली आहे. डिओ स्कूटरवरून हा साधारण २५ - ३० वर्षाचा युवक मंडईत, गर्दी असलेल्या दुकानात जातो. त्या गर्दीचा फायदा घेत काहीतरी खरेदी करतो. त्यासाठी विक्रेत्याला २ हजारची नोट देतो. विक्रेता त्याला उरलेले पैसेही परत करतो. पण त्याच ठिकाणी थांबून आणि बोलण्यात गुंतवून तो विक्रेत्याला गोंधळात टाकतो व राहिलेले पैसे परत द्या म्हणून सांगतो. विक्रेता पैसे परत दिलेत की नाही या संभ्रमात त्याला पुन्हा पैसे देतो.
भंडाफोड व्हायला लागताच ठोकली धूम
शहरात काही ठिकाणी असे अनुभव विक्रेत्यांना आले असल्याचे ऐकायला मिळत आहे. परवाच जुना मोटर स्टँड परिसरात असाच प्रकार घडला. विक्रेत्याकडून दुसऱ्यांदा पैसे घेण्यासाठी तो घोळ घालत असतानाच एका चाणाक्ष व्यक्तीला हा प्रकार लक्षात आला. आपल्यासमोरच अन्य एका विक्रेत्याला या भामट्याने गंडा घातल्याचे व तो निघून गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्या विक्रेत्याच्या लक्षात आल्याचे संबंधित व्यक्तीने सांगायला सुरूवात करताच या भामट्याने लगबगीने आपल्या गाडीकडे धाव घेऊन तिथून धूम ठोकली. त्यामुळे सध्या शहरात या विषयाची चर्चा रंगली आहे.
फसवणूक करायला चटावलेला भामटा कोण ?
पांढऱ्या कोटाची कवचकुंडले घालून लोकांची फसवणूक करायला चटावलेला हा भामटा कोण, तो वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे की असाच लफंगेगिरी करण्यासाठी पांढऱ्या कोटाला बदनाम करत सुटला आहे याचा उलगडा होणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणेने या भामट्याची मोडस ऑपरेडी लक्षात घेऊन बारीक लक्ष ठेवून त्याचा बुरखा फाडावा व व्यापारी वर्गाची होत असलेली फसवणूक थांबवावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या