घोलप यांनी युवकांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहित करावे - जगदाळे
Satara News : कराड तालुक्यातील घोलपवाडी गावचे सुपुत्र कॅप्टन रावसो घोलप यांनी लष्करात ऑनररी कॅप्टन पदाच्या माध्यमातून केलेले काम आदर्शवत असून सेवानिवृत्तीनंतर आता त्यांनी युवकांना मार्गदर्शन करून देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले.
कॅप्टन रावसो घोलप लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती शालन माळी, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजयराव साळुंखे, निगडी सोसायटीचे चेअरमन संजय घोलप, किवळ सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव साळुंखे, संदीप गायकवाड, सरपंच पुष्पा चंदुगडे, पोलीस पाटील शेखर जाधव, दिलीपराव कदम, वनाधिकारी सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
... अशा अधिकाऱ्यांमुळेच देशाभिमान उंचावतो
तीस वर्ष कुटुंब व समाजापासून दूर राहून हिमालयात सिक्कीमसारख्या बर्फाळ प्रदेशात काम करणाऱ्या कॅप्टन रावसो घोलप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच आपला देशाभिमान आणखी बळावतो. अशा पहाडी क्षेत्रात सेवा करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण निवांत राहतो, असे उद्गार जगदाळे यांनी यावेळी काढले.
सैनिक हेच खरा आपला आदर्श आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवकांनी सैनिकी सेवेची परंपरा अखंड चालवावी, असे डॉ. साळुंखे म्हणाले. संजय घोलप यांनीही मार्गदर्शन केले.
लष्करी सेवेत जाण्यासाठी तरुणांना मार्गदर्शन करणार
घराला सैनिकी वारसा असल्याने बारावीत असतानाच सैन्यात भरती झालो. सिलिगुडी, पंजाब, श्रीनगर, कारगिल, पठाणकोट, गुवाहाटी, इलाहाबाद, मणिपूर आदी ठिकाणी देशसेवा बजावली. बर्फाळ प्रदेशात २४ तास काम केले. आता कॅप्टन पदावरून निवृत्त होताना विलक्षण आनंद होत आहे. सेवाकाळात वडील भगवान घोलप, आई मालन, पत्नी सविता व कुटुंबातील सर्वांचीच मोलाची साथ व सहकार्य लाभले. यापुढे आता तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे, असा मानस कॅप्टन घोलप यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
लालासाहेब घोलप यांनी स्वागत केले. अनिल सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर संदीप गायकवाड यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या