Satara News : अत्यंत उंचीवरून उडणारा पट्टेवाला हंस दाखल


परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पक्षी निरीक्षक, पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण
 

Satara News : जगातील सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणारा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार - हेडेड गुज (अन्सर इंडिकस) / पट्ट कादंमब / पट्टे वाला हंस) या पक्षाचे सातारा जिल्ह्यातील सूर्याचीवाडीजवळील तलावावर आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक, पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच जवळपास २२ बार हेडेड गुज हे मायणी पक्षी संवर्धन क्षेत्रापासून पुढे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्याची वाडीच्या पूर्वेला असलेल्या एका उथळ तलावावर विसावले आहेत. मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक रोहन भाटे व वन्यजीव प्रेमी हेमंत केंजळे यांनी मायणी, सूर्याचीवाडी, येरळवाडी, धोंडेवाडी या तलावांना भेट दिली व पक्षी निरीक्षण केले. 

त्यापैकी फक्त सूर्याचीवाडी येथे २२ बार हेडेड गुज, अल्प प्रमाणात नॉर्थन पिनटेल बदक, कॉमन कुट, रेड हेड पोचार्ड, लिटील ग्रीब, ग्रे हेरॉन, ओस्प्रे, हेरीयर, रंगीत करकोचा, पांढरा व काळा आयबीस, काळ्या पंखाचा शेकट्या, ग्रीन शन्क यासह इतर काही पक्ष्यांची नोंद घेतली आहे.

पूर्णत: शाकाहारी असलेला पक्षी 

पट्टे वाला हंस हा पक्षी फिकट राखाडी रंगाचा आहे. त्याच्या डोक्यावर असलेल्या दोन काळ्या पट्ट्यांमुळे सहजतेने ओळखले जाते. पाय नारंगी पिवळे, तर चोचही नारंगी पिवळी व चोचीच्या शेवटी राखाडी टिपका असतो. त्याची लांबी ७१ - ७६ सेंटीमीटरपर्यंत असते आणि त्याचे वजन साधारण १.८७ – ३.२ किलोपर्यंत असते. हा सुंदर पक्षी हा पूर्णत: शाकाहारी आहे. तलावातील शेवाळ, गवताचे बी, ज्वारी, शाळू हे खातात.

मध्य - चीन आणि मंगोलियामध्ये, कझाकीस्थान, रशिया, तिबेट, दक्षिण आशियातील पर्वतीय तलाव आणि मध्य आशियात बार - हेडेड गुज आढळतात आणि तेथे त्यांचे प्रजनन होते. मादी एकावेळी जमिनीवर घरट्यात तीन ते आठ अंडी घालते.

त्यांचे पंख मोठे असतात व ते हिवाळ्यामध्ये भारतीय उपखंडात स्थलांतर करण्यास सुरूवात करतात आणि हंगामाच्या शेवटपर्यंत येथेच राहतात. अगदी उंचीवर देखील हे पक्षी उडू शकतात. ते भारतात हिमालय ओलांडून येतात आणि पुन्हा हिमालयीन परिसर पार करून आपल्या घरी परततात. जगातील सर्वात उंच-उंच स्थानांपैकी एक असलेला हिमालय पार केल्यामुळे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये ते आकर्षण ठरले आहे.

बार - हेडेड गुजची क्षमता जबरदस्त 

हवेमध्ये उड्डाण करणाऱ्या पक्ष्यांमध्ये ऑक्सिजनच्या अत्यधिक मागणीची क्षमता टिकवून ठेवण्याची त्यांची क्षमता अपवादात्मक आहे. हायपोक्सियामध्ये उच्च दराने ऑक्सिजनची वाहतूक आणि सेवन करण्यासाठी बार - हेडेड गुजची क्षमता अतिशय जबरदस्त आहे. ते अशक्य वाटणारे शारीरिक शौर्य साध्य करतात. अत्यंत उंचीवर उड्डाण करणारे हवाई परिवहन, जेथे समुद्र पातळीवर १० टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन आढळतो तेथे ते सहज उडतात व ते देखील जवळपास १७ तास न थांबता पंख फडफडत १५०० किलोमीटरचा पल्ला सहज पार करतात हे अभ्यासांती सिध्द झाले आहे. म्हणूनच बार - हेडेड गुज अनेक दशकांपासून जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करतात.

१९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गेच्या चढत्या पाठीराख्यात न्यूझीलंडचा जन्मलेला गिर्यारोहक जॉर्ज लोव यांच्या नोंदीनुसार त्याने माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर उडताना पाहिले आहे. हे शिखर अंदाजे २९ हजार फूट उंच आहे.

स्थलांतरित पान पक्षी अद्याप नाहीत

जलसंधारणाची कामे झाल्यामुळे मायणी व येरळवाडी तलावांची खोली वाढलेली आहे. पाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्थलांतरित पान पक्षी अजून तेथे दाखल झालेले नाहीत.

- रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षीतज्ज्ञ

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या