जिल्ह्यात कलम १४४ लागू; कोरोना पार्श्वभूमीवर काळजी घ्या - जिल्हाधिकारी
Satara News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात या वर्षीचा नाताळचा सण साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी खिश्चन बांधवांना केले आहे.
नाताळ सण साध्या पध्दतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा व्हावा यासाठी त्यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ जारी केले असून २५ डिसेंबर रोजी रात्री बारापासून नाताळ सण उत्सव पूर्ण होईपर्यंत हे आदेश जारी राहणार आहेत.
नाताळ निमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.
योग्य त्या उपाययोजना कराव्यात
नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
चर्चमध्ये प्रभू येशू खिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने स्टॉल लावण्यात येऊ नयेत.
वृध्द व बालकांनी घराबाहेर जाणे टाळावे
६० वर्षांवरील नागरिकांनी तसेच १० वर्षांखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.
सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे. ३१ डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी ७ वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावे.
नियमांचे पालन करणे बंधनकारक
कोविड - १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या