सातारा बसस्थानकावर प्रवाशांनी केक कापून केला वर्धापनदिन साजरा
Satara News : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासीसेवा, उत्पन्न आणि लोकप्रियतेच्या बाबतीत महाराष्ट्रातील पहिल्या तीन क्रमांकाच्या रूटमध्ये असलेल्या 'सातारा - स्वारगेट - सातारा' विनावाहक विनाथांबा बससेवेचा एकोणिसावा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने या गाड्या फुलांच्या माळांनी आकर्षक सजवण्यात आल्या होत्या.
यावेळी नगरसेवक राजू भोसले, महामंडळाचे सातारा विभागाचे तांत्रिक विभागप्रमुख मोहिते, सातारा आगार प्रमुख भोसले, अजिंक्य ठाकूर, आगारातील चालक आणि वाहक, या मार्गावरील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तांत्रिक शाखा प्रमुख मोहिते यांनी एसटीच्या नवीन उपक्रमांबद्दल तसेच नवीन बस बांधणी व त्यातील बदल याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच आगार प्रमुख भोसले यांनी नवीन आलेल्या गाड्या व जुन्या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीबद्दल आश्वासन दिले. सातारा - स्वारगेट बससेवा अखंड सुरू राहील, अशी ग्वाही दिली.
नवीन - जुन्या गाड्यांचे व्यवस्थित नियोजन करा
राजू भोसले यांनी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना देत असलेल्या अविरत सेवेचे कौतुक करून आभार मानले. युवाराज्य फौंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी नवीन गाड्या आल्यामुळे जुन्या (आयशर) गाड्या अन्य मार्गांवर न वळवता नवीन आणि जुन्या गाड्यांचे व्यवस्थित नियोजन करून सातारा - स्वारगेट - सातारा सेवा सुरळीतपणे चालवावी असे मत व्यक्त केले. तसेच या मार्गाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अजून काही ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नारळ फोडून केक कापण्यात आला. तसेच वाहक आणि चालकांना फेटा बांधून सजलेल्या गाड्या प्रवासी घेऊन मार्गस्थ करण्यात आल्या. प्रवासी मित्र मंडळाचे प्रतिनिधी आणि या कार्यक्रमाचे संयोजक श्रीकांत गायकवाड, प्रवीण जमदाडे यांनी आभारप्रदर्शन केले.
सजावटीसाठी सरसावले अनेक हात
वर्धापन दिनानिमित्त 'सातारा - स्वारगेट - सातारा' गाड्यांना मार्ग फलक आणि स्टीकर लावण्यासाठी तीर्थराज पवार, वसंत शिंदे, धनराज जगताप यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर सातारा - स्वारगेट बुकिंग ऑफिस आणि स्थानक येथील रंगरंगोटीसाठीची मदत डॉ. अभिजित गुरव यांनी केली. या स्थानकावर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची चित्रे काढून सुशोभिकरण करण्याचे काम यशवंत देशमुख यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या