Satara News : पदवीधरसाठी चुरशीने, तर शिक्षकसाठी ईर्ष्येने मतदान


जिल्ह्यात पदवीधरसाठी ५६, शिक्षकसाठी ७५ टक्के मतदारांनी बजावला हक्क

Satara News : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात आज उत्साहात व शांततेत मतदान झाले. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात पदवीधरसाठी सरासरी ५६, तर शिक्षकसाठी सरासरी ७५ टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. आपल्या उमेदवाराला सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी मतदारांना ईर्ष्येने मतदानासाठी बाहेर काढले जात होते.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे मावळते आमदार भाजपचे चंद्रकांत पाटील कोथरूड (पुणे) मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपने येथून संग्राम देशमुख यांच्या उमेदवारीच्या रूपाने नवा चेहरा दिला आहे. तर शिक्षक मतदारसंघातून गतवेळी निवडून आलेले महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे दत्तात्रय सावंत यावेळीही मैदानात आहेत. महाविकास आघाडीने पदवीधरसाठी अरूण लाड आणि शिक्षकसाठी प्रा. जयंत आसगावकर यांना रिंगणात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीने विभागासह राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे निकालाविषयीही कमालीची उत्सुकता आहे.

दोन्ही बाजुंनी प्रतिष्ठा पणाला

पुणे विभागात उमेदवारांची भाऊगर्दी होती, परंतु महाविकास आघाडी विरूध्द भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्यात मुख्य लढत पहायला मिळाली. या उमेदवारांसाठी दोन्ही बाजुंनी प्रतिष्ठा पणाला लागली. गेले काही दिवस शिक्षक, पदवीधरांचे मेळावे, गाठीभेटी या माध्यमातून वातावरण ढवळून निघाले होते. दोन्ही मतदारसंघात अन्य पक्ष - संघटनांचे व काही अपक्ष उमेदवारांनी जोर लावून रणधुमाळीत रंगत आणल्याचे चित्र होते.

आज सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मतदानाला वेग आला. दुपारी वेग काहीसा मंदावला. पण शेवटच्या टप्प्यात पुन्हा मतदानाला गती आली. विशेषत: शिक्षक मतदारसंघात सर्व पक्ष - संघटनांनी जोर लावल्याने मोठी चुरस पहायला मिळाली. आपापल्या उमेदवारासाठी ईर्ष्येने मतदारांना बाहेर काढले जात होते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात पदवीधरसाठी दुपारी १२ पर्यंत २०.२३ टक्के, दुपारी ४ वाजेपर्यंत ४९.३५ टक्के, शिक्षक मतदारसंघासाठी दुपारी १२ पर्यंत ३१.३४ टक्के, दुपारी ४ वाजेपर्यंत ७४.३६ टक्के इतके मतदान झाले.

संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने दक्षता

पदवीधरसाठी जिल्ह्यात ५९ हजार ७०, तर शिक्षकसाठी ७ हजार ७१० इतके मतदार नोंदवले गेले होते. दोन्हीसाठी अनुक्रमे १३२ व ४४ मतदान वेंâद्रांची व्यवस्था होती. कोरोना काळात ही निवडणूक होत असल्यामुळे प्रशासनाने संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली होती.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या