मसूर (जि. सातारा) येथील लोकसाहित्याच्या अभ्यासक व संवेदनशील लेखिका स्वाती चेणगे - बाजारे लिखित ‘हा सागरी किनारा’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. २६ डिसेंबर रोजी मसूर येथे राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येत आहे. त्यानिमित्त...
पुस्तक परीक्षण
नेहमीच्या आयुष्यात आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो. माणसं, निसर्ग पाहतो. पण हे अनुभवल्यानंतर लेखक एक चिंतन करतो आणि लेखातून व्यक्त होतो. हे संवेदनशीलतेचे उत्कट लक्षण असते. लेखिका स्वाती चेणगे - बाजारे यांनी लिहिलेला 'हा सागरी किनारा' लेखसंग्रह एक आशावादाची पेरणी वाचकांच्या मनात करतो.
समुद्राची गाज, त्याची विशालता, अथांगता आपण सगळेच अनुभवतो. पण माणसाने समुद्राप्रमाणे असावे, तो अस्वच्छता स्वत:त सामावून घेतो आणि सुंदर मोती माणसाला बहाल करतो हे सांगताना लेखिका सागराशी असणारं मनोज्ञ नातं लेखातून व्यक्त करते. सागराचं रौद्रही प्रतिबिंबित करते.
'सुंदरा ही वसुंधरा' या लेखात पृथ्वीचं सुंदर मनमोहक रुप सांगताना माणसानं तिला पर्यावरणाचे नियम न पाळून बाधित करण्याचा प्रयत्न केला आहे हेही लेखिका सांगते. आणि शेवटी वसुंधरा ही मानवी जीवनाचा आधार आहे, तो नष्ट झाला तर माणसाचे जगणे अवघड होईल याची विविध प्रकारे जाणीव करुन देते.
पालक मुलांच्यावर काहीवेळा वेगवेगळ्या प्रकारांनी ताण निर्माण करतात. त्याची दुसऱ्याशी तुलना करतात. त्याची नक्की आवड कशात आहे याचा विचार न करता स्वत:चे म्हणणे त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात आणि यातून मुलांच्या मनात नैराश्य येण्याची शक्यता असते. अशावेळी आपली आतली साद मुलांनी ऐकली पाहिजे. मुलांना यशासोबत अपयश पचवायला शिकवलं पाहिजे हे सांगताना 'साद' या लेखात लेखिका मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळी सांगते.
'काळ्याकुट्ट काळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुझ्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन उभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्ही ठरवा.'
एखाद्या अवघड प्रसंगात क्षणभर हातपाय गळल्यासारखे होतात. मदतीला कोण येईल का असे वाटत राहते आणि अवचित कोणीतरी माणूस देवासारखा धावून येतो आणि प्रसंग निभावला जातो. देवच जणू माणसाचे रुप घेवून मदतीला येतो. त्या क्षणी तो देवमाणूस असतो. 'माणसातील देव' या लेखातला प्रसंग वाचला की प्रत्येकाला आपल्याही आयुष्यातला तसाच प्रसंग आठवून जातो. हे लेखिकेचे यश आहे.
अस्तुरी जनम, स्त्री जीवन - एक मागोवा, ओवी स्त्री मनाची हे तिन्ही लेख स्त्री जीवनावर प्रकाश टाकणारे. लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक असल्यामुळे स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास प्रतिबिंबित करताना जात्यावरच्या ओव्यांचा आधार लेखिकेने घेणे स्वाभाविक आहे. ग्रामीण भागातील स्त्रीची सुखदु:खे या ओव्यांमधून सातत्याने व्यक्त झाली आहेत. हे मौखिक वाङमय पिढ्यानपिढ्या या स्त्रीयांनी जपले आहे.
लेकीचा ग जलम, जलम येऊन चुकला
रातदीन बाई, बैल पाण्याला जुपिला
यासारखी ओवी स्त्रीचे कष्ट अधोरेखित करते. तसेच
देवा तुझी हाक, येते म्हणून चुकले
अस्तुरी जलमा आले, औक्ष वायारती गेले
यासारख्या ओव्या कित्येक कालावधीत घडलेले स्त्रीचे शोषण व्यक्त करणाऱ्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृती स्त्रीला नेहमी दुय्यम मानते हे ओव्यांच्या आधाराने लेखिकेने सांगितले आहे. स्त्रीची संसारात कायम घुसमट झाली आहे. वेगळे भोग तिच्या नशिबी आले आहेत. स्त्रीला देवी मानून देव्हाऱ्यात बसवलं, पण प्रत्यक्षात तिच्या नशिबी वेगळं भोगणं आलं, असं लेखिका सांगते.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. पण त्यासाठी त्यांना झगडावे लागले. समाजाशी लढा द्यावा लागला. तरीसुध्दा अजूनही स्त्री भ्रूणहत्या, बलात्कार, विनयभंग याला तोंड द्यावे लागते. या समस्या संपून स्त्रीला मोकळ्या आकाशात भरारी घ्यायला बळ द्यायला पाहिजे असे लेखिका म्हणते. स्त्री आणि स्त्रीत्वाचा आदर होणं गरजेचं आहे. त्या जाणीवेची जागृती स्त्रीत व्हायला पाहिजे. हे तिचं म्हणणं आहे.
या लेखसंग्रहात इतरही छोटेमोठे लेख आहेत. आकाशावरचा, साने गुरुजींचा उल्लेख असणारा असे वेगवेगळ्या विषयावरचे लेख आहेत, जे वाचकाला अंतर्मुख करतात. विचार करायला लावतात. माणूस माणसापासून तुटत चाललाय. मूल्ये ढासळत चाललीत यांची नोंद लेखांमध्ये जाणवते. माणसाने मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी त्या डॉ. कलाम यांचे उदाहरण देतात.
लोकशाहीवर निष्ठा ठेवली पाहिजे. स्वैराचार आणि नको ते स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही नव्हे. लेखिकेची भाषा साधी सोपी आहे, पण आशावाद निर्माण करणारी आहे. डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लेखसंग्रहाची आशयगर्भता वाढवणारी आहे. स्वाती चेणगे - बाजारे यांच्या पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा.
- डॉ. राजेंद्र माने
- हा सागरी किनारा
- लेखिका : स्वाती चेणगे - बाजारे
- प्रकाशक : विजया वितरण
- पृष्ठे : ९६, मूल्य : रूपये १५०/-
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या