बर्ड फ्ल्यूचा अद्याप धोका नाही, पण... 'खावे की खाऊ नये ?'
Satara News : सातारा जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाचा सध्या 'हॅमलेट' झाल्याचे पहायला मिळत आहे. बर्ड फ्ल्युचे वादळ घोंगावत असताना पशुसंवर्धन विभाग 'नक्की याला वाचवू की त्याला वाचवू' अशा द्विधा मनस्थितीत दिसत आहे. एका बाजुला पोल्ट्री उद्योगही वाचला पाहिजे ही तळमळ आणि दुसरीकडे यातून काही धोका उद्भवला तर त्या पापाचे वाटेकरी व्हावे लागेल ही अनामिक भीती अशा कात्रीत हा विभाग अडकल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच कोंबडी आणि अंडी बिनधास्त खा असे सांगतासांगता हा विभाग 'दक्ष' रहायलाही सांगत आहे.
जनता कोरोनाच्या संकटातून थोडीफार कुठे सावरत असताना बर्ड फ्ल्यूची चाहुल लागल्याने लोकांनी धसका घेतला आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात कोंबड्यांच्या बाबतीत 'बदनामी' झाल्याने पोल्ट्री व चिकण व्यावसायिकांचे वंâबरडे मोडले होते. आता बर्ड फ्ल्युच्या बाबतीत चर्चा सुरू झाल्यापासून चिकण, अंडी या अनुषंगाने उलटसुलट ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगावर पुन्हा एकदा संक्रांत येण्याच्या शक्यतेने पोल्ट्री व्यावसायिकांची गाळण उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोल्ट्री उद्योगाला सावरावे की सर्वसामान्य जनतेला वाचवावे हेच कळेनासे झाले आहे.
'टू बी ऑर नॉट टू बी' असा प्रश्न
थोर नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या 'हॅमलेट' नाटकातील हॅमलेटला 'टू बी ऑर नॉट टू बी' असा प्रश्न पडला होता. शेक्सपिअरप्रमाणेच हॅमलेट आणि त्याच्या प्रश्नाला जागतिक कीर्ती लाभली. त्यामुळे कोणाचीही अशी द्विधा मनस्थिती होते, तेव्हा त्यांचा 'हॅमलेट झाला' असे म्हटले जाते. तशीच काहीशी अवस्था पशुसंवर्धन विभागाची सध्या झाली आहे काय असा प्रश्न आहे.
कारण, जिल्ह्याला बर्ड फ्ल्यू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये. बर्ड फ्ल्यू रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात असून पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून कामकाज करीत आहे, असा धीर पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरीत पक्ष्यांचे मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित पशुसंवर्धन विभागास माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
यासंदर्भात पूर्वार्ध मांडताना डॉ. परिहार सांगतात, परंपरागत भारतीय अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडी मास व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित असून पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत.
पक्ष्यांच्या मृत्युबाबत दक्ष राहण्याच्या सूचना
त्याचवेळी या विषयाचा उत्तरार्ध मांडताना ते सांगतात, बर्ड फ्ल्यू रोगाचे विषाणू प्रामुख्याने स्थलांतरीत पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यांमध्ये आढळून येत असल्याने जिल्ह्यामधील सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी पक्ष्यांच्या मृत्युबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यूचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्राण्यांमधील सांसर्गिक व संक्रामक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये बँकयार्ड पोल्ट्री किंवा कोणत्याही व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे मृत्यू आढळून आल्यास जबाबदार नागरिक किंवा व्यवसायिक या नात्याने तशी माहिती त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला देणे बंधनकारक आहे. ही बाब लपवण्यात येवू नये. तशी सूचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती तथा तालुका नोडल अधिकारी यांनाही तातडीने देण्यात यावी म्हणजे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.
पशुसंवर्धन विभाग एकाच वेळी अशा दोन गोष्टी समोर ठेवत असेल, तर लोकांनी चिकण - अंडी खावीत तरी कशी ? खायला काहीच हरकत नाही असे छातीठोकपणे सांगितले जात नाही तोपर्यंत लोकांनी धाडस कसे करावे ? त्याशिवाय पोल्ट्री उद्योग तरी कसा उभारी घेणार ?
सातारा जिल्ह्यात सुमारे ४० लाख कोंबड्या
सातारा जिल्ह्यामध्ये १९ व्या पशुगणनेनुसार ३९ लाख ७९ हजार ६११ इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. आजमितीला नव्याने मोठ्या प्रमाणात देशी पक्षी संगोपन, ब्रॉयलर संगोपन, लेअर पक्षी संगोपन व्यवसायात वाढ झाली आहे. सर्व पोल्ट्री व्यवसायिकांनी त्यांच्या पक्षी फार्ममध्ये जैव सुरक्षा नियमांचे कोटेकोरपणे पालन करुन पक्षांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. ५ हजार पेक्षा जास्त पक्षांचे संगोपन करत असलेल्या किंवा ५०० पेक्षा जास्त क्षमतेने अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिले निर्मिती करत असलेल्या व्यावसायिकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही डॉ. परिहार यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या