देवघरातील समईप्रमाणे इतरांसाठी तेवत राहणाऱ्या वहिनी
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोचिं साधू ओळखावा । देव तेथेचिं जाणावा।या उक्तीप्रमाणे काही लोक आपलं जीवन समर्पित व त्याग करीत असतात. परंतु, त्याची प्रचिती ही केवळ त्यांच्या संपर्कात आल्यानेच येत असते. दुसर्याच्या सुखासाठी व उध्दारासाठी काही लोक खर्ची पडतात. मी कोण आहे? याच्यापेक्षा माझे कर्तव्य काय आहे हे समजून जे लोक काम करतात ते ईश्वराचा एक अंशच असतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सौ. रश्मी सुभाष एरम. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
सौ. रश्मी सुभाष एरम यांचा जन्म मुंबई येथे झाला. घरची श्रीमंती असुनसुध्दा ‘मी’ पणाचा अभिमान नसणारी ‘गांगला’ या कुटुंबातील रश्मी गांगला यांचा कराड शहरातील निष्णात सर्जंन व वैद्यकीय क्षेत्रात सर्वपरिचित असणारे डॉक्टर श्री. सुभाष शिवराम एरम यांच्याशी सन 1979 मध्ये विवाह झाला आणि त्या कराडवाशीय झाल्या.
रश्मी वहिनींना मेरिटवर मेडिकल कॉलेजला अॅडमिशन मिळत होती, परंतु कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी डॉक्टर न होण्याचा निर्णय घेतला. कै. डॉ. दत्तात्रय शिवराम एरम व सौ. शीला दत्तात्रय एरम दीर आणि जाऊ यांना आई-वडिलांचे स्थान देवून एरम कुटुंबियांचा वसा आणि वारसा पुढे चालविण्याचे काम सौ. रश्मी वहिनी यांनी मोठ्या कुशलतेने केले. रामायणातील राम-लक्ष्मण व सीता यांची विशालता, प्रेम, नात्यामधील आपुलकी, जिव्हाळा मला या कुटुंबामध्ये पहायला व अनुभवायला मिळाला.
एरम कुटुंबीय मुळचे हुशार व रॉयल. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती माणूसलोभी आहे. पैशापेक्षा माणुसकीला जास्त किंमत देऊन माणसाला माणूस जोडण्याची परंपरा आजही तशीच आहे. या कुटुंबात रश्मी वहिनींचे आगमन म्हणजे लक्ष्मीच्या पावलाने आलेली समृध्दी व संपन्नता आहे. त्यांनी आपल्या स्वभावाने घराचा स्वर्गच तयार केला. या कुटुंबाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समाजकार्याचा वारसा असल्याने सर्वच थरातील लोकांची ये-जा व वर्दळ नियमित असते. येणारा प्रत्येक व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस करणे हे त्यांच्या मूळच्या स्वभावात जणू रूजलेलेच होते.
सेवकांच्या कुटुंबातील एक हिस्सा
शारदा क्लिनिकमधील किंवा महिला गृहउद्योगामधील कोणताही सेवक असू दे त्याच्या सुख:दुखात समरस होणे, कठीण प्रसंगी त्याला मदतीचा हात पुढे करणे, ‘आम्ही आहोत घाबरू नका' हा विश्वास निर्माण करणे त्यामुळे सौ. रश्मी वहिनी सेवकांच्या कुटुंबातील एक हिस्सा बनल्या. प्रत्येक सेवक मोठा झाला पाहिजे, त्यांचे राहणीमान सुधारले पाहिजे, त्यांच्या मुलांनी शिक्षण घेवून उच्च शिक्षित झाले पाहिजे यासाठी वहिनी नेहमी आग्रही राहिल्या.
कै. डॉ. दत्तात्रय शिवराम एरम (बाबा) यांच्या जाण्यामुळे एरम कुटुंबियांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याचे श्रेय जेवढे डॉ. बाळासाहेब एरम यांना जाते तेवढेच श्रेय सौ. रश्मी वहिनींना आहे. कौटुंबिक जबाबदारी, शारदा क्लिनिकचे अॅडमिनिस्ट्रेशन, कराड अर्बन महिला विकास संस्था नावारूपाला आणून मूकबधिर शाळेचे संचालक पद तेवढ्याच जबाबदारीने पार पाडले. बाबांच्या मृत्यूनंतर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एरम कुटुंबीयांवर अनेक आघात झाले, संकटे आली व सन 2005 साली वहिनींना ब्रेन ट्युमरचे निदान झाले हा फार मोठा धक्का होता. परंतु डॉ. बाळासाहेब एरम व वहिनी यांच्या शांत आणि संयमी स्वभावाने सर्वांवर मात केली.
संयम, माफ करण्याची ताकद
संकटे मुळातच परीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यात तोच पास होतो. ज्यांचा पुण्यसंचय व प्रारब्ध चांगले आहे, ज्या माऊलीने दुसर्याच्या चेहर्यावर सतत आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवली त्यांच्या चेहर्यावरचा आनंद कधीच कमी होणार नाही हा सृष्टीचा नियम आहे. संयम, माफ करण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याने कोणत्याही संकटाची त्यांना भीती वाटली नाही. येणार्या संकटापुढे हार न मानता मानवी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तडजोड हा एक मार्ग आहे व तो त्यांनी वेळोवेळी स्वीकारला. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात आहे हे त्यांनी आपल्या कृतीनेच दाखवून दिले. वेळ सोडून या जगात कोणीच न्यायाधीश नाही.कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात, वेळ खराब असेल तर आपले आपलेही परके होतात. परंतु वहिनींनी परक्यांनाही आपले करण्याची भूमिका तसेच कुटुंब एका धाग्यात जखडून ठेवण्याचे काम केेले.
४० वर्षे अखंड रुग्णसेवा
वहिनींनी जे उद्दात आहे व उत्तम आहे त्याचा स्वीकार केला. तेच कुटुंब व इतरांना देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मुलगा ‘चिन्मय’ व मुलगी ‘पूजा’ वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करून आपआपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहेत. सून सौ. रोहिणी एरम उच्च विद्याविभूषित असून कराड अर्बन महिला विकास संस्था व शारदा क्लिनिकचा कार्यभार जबाबदारीने पार पाडत आहेत.
प्रतिक्रीया देण्यापेक्षा प्रतिसाद देवून 21 व्या शतकाची वाटचाल करताना बदल ही काळाची गरज असल्याने येणार्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी व जुने शारदा क्लिनिक व आत्ताचे शारदा क्लिनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. चिन्मय एरम यांच्या संकल्पनेतून साकारलेली कलाकृती आहे. यामध्ये रूग्ण सेवा देण्याचे काम गेली 40 वर्षे अखंड सुरू आहे.
कराड अर्बन महिला विकास संस्थेच्या वतीने शारदा क्लिनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अॅडमिट होणार्या रूग्णांची जेवणाची गैरसोय होऊ नये या उद्दात हेतूने सर्व रूग्णांना सकाळी चहा-नाष्टा, दुपारचे व रात्रीचे सात्विक भोजन देवून रूग्ण व डॉक्टर यांच्या नात्यातील जिव्हाळा जोपासला.
कित्येक रूग्णांना जीवदान
माहे मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र सुरू झाला. कोरोना रूग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले. गेली 40 वर्षांपासून शारदा क्लिनिकशी बांधील असणार्या रूग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना वेळेत उपचार व्हावा यासाठी शारदा क्लिनिकने आपले हॉस्पिटल ‘कोव्हीड सेंटर’ म्हणून जाहीर केले. त्यामुळे कित्येक रूग्णांना जीवदान मिळाले. ही सेवा देत असताना सर्व एरम कुटुंबीय कोव्हीड पॉझिटिव्ह झाले. परंतु परमेश्वरावरील नितांत श्रध्दा आणि रूग्णावरील प्रेम व त्यांच्या आशिर्वादावर कोव्हीडच्या विळख्यातून एरम कुटुंबीय बाहेर पडले.
माझ्या कुटुंबासाठी सौ. रश्मी सुभाष एरम (धाकट्या वहिनी) यांचे स्थान देव्हार्यातील देवापेक्षा कमी नाही. आमच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. सुभाष एरम ऊर्फ बाळासाहेब व धाकट्या वहिनी यांनी मला जन्मदात्या आईवडिलांप्रमाणे प्रेम दिले. जीवनात सुख:दुखाच्या क्षणी समरस होऊन आधार दिला. त्यांनी दिलेल्या प्रेमातून आमचे कुटुंब कधीही उतराई होऊ शकत नाही. अशा कुटुंबवत्सल सौ.रश्मी सुभाष एरम (धाकट्या वहिनी) यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!
- सौ. सुवर्णा बापूसोा यादव, कराड.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

1 टिप्पण्या
Chan
उत्तर द्याहटवा