शेतीतज्ञ समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे प्रशंसोद्गार
Satara News : शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यामध्ये राष्ट्रीयकृत व इतर खाजगी बँकांपेक्षा सातारा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेस खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने दिलेल्या जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठा उद्दिष्टापैकी जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दिष्टाच्या १०० टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्तता केली असल्याने बँकेचे एकूण कामकाज नेत्रदीपक आहे, असे उद्गार सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.
नाबार्ड व शासनमान्य राज्यस्तरीय स्थायी समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध पिकांकरिता शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी काय दराने कर्जपुरवठा करावा यासाठी दरवर्षी शेतीतज्ञ समितीची सभा आयोजित केली जाते. सन २०२१ - २२ हंगामासाठीचे पीक कर्जदर ठरविण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच शेतीतज्ञ समितीची सभा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सभेचे नियोजन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत समितीचे सचिव व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी समजावून घेऊन शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविणे, जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे पीकनिहाय शेतकऱ्यांचे चर्चासत्र आयोजित करण्याच्या सूचना कृषी विभाग, पशुसंवर्धन व मत्स्य विभाग यांना दिल्या.
जिल्हा बँकेची गौरवशाली परंपरा
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन जिल्हा बँकेचा प्रगतीपर आढावा सादर केला. कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव जगभर सुरु असताना बँकेने जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या सहकार्याने ९७ टक्के विक्रमी कर्जवसुली केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना बँकेमार्फत व राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या व्याजपरतावा योजनांचा लाभ मिळणार आहे असल्याचे सांगितले. देशामध्ये सातारा जिल्हा बँकेची गौरवशाली परंपरा असून बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटविलेला आहे. बँकेचे दर्जेदार कामकाज विचारात घेऊन बँकेला नाबार्ड, राज्य बँक, सहकार खाते, तसेच इतर नामांकित संस्थांकडून ऐंशीहून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सभेमध्ये निमंत्रित सदस्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पिकांबाबत पीकनिहाय सखोल चर्चा करुन हंगाम २०२१-२२ साठी पीक निहाय २.५० ते ९ टक्केपर्यंत पीक कर्जदरात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली. ही वाढ राज्यस्तरीय समितीस कळविण्यात येणार असून त्यांच्या मान्यतेनंतर हे पीक कर्जदर हे एप्रिल २०२१ पासून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी तसेच जिल्हा बँकेला लागू होतील. उपस्थित शेतकरी व सचिव यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.
सभेसाठी मान्यवरांची उपस्थिती
सभेसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वाय. एस. पाटील, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक सुबोध अभ्यंकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संतोष विरकर, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय (राज्य शासन) श्रीकांत वारुंजीकर, दुग्ध विकास अधिकारी व्ही. पी. शिंदे, बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे व्यवस्थापक बी. एम. यादगीरवार व जिल्ह्यातील प्रमुख बँकांचे प्रतिनिधी तसेच सातारा जिल्हा बँक संचलित यशवंत किसान मंचचे रामदास कदम, बलभीम भोसले, शेतकरी विजय मांडवे, अशोक गोडसे, भाऊसाहेब जाधव व सचिव प्रतिनिधी जयहनुमान घाडगे, चंद्रशेखर फडतरे हे उपस्थित होते. जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या