कोरोना संकटात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सातारा जिल्हा बँकेचा दिलासा
Satara News : कोरोनामुळे मरण पावलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी सुभाष दिनकर शिवणकर यांच्या वारसाला बँकेच्या वतीने करण्यात आलेल्या विमा पॉलिसीचा १० लाखांचा क्लेम बँकेचे अध्यक्ष आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या वातावरणामध्ये जिल्हा बँकेचे कर्मचारी ग्राहकांना अविरतपणे बँकिंग सेवा देण्याचे काम करीत होते. या पार्श्वभूमीवर बँकेने कर्मचारी सुरक्षा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना 'जीवन विमा संरक्षण' देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आयुर्विमा सातारा विभागाच्या माध्यमातून प्रत्येकी रुपये १० लाख विमा संरक्षण असणारी विमा पॉलिसी घेतली आहे. बँकेचे सेवक सुभाष शिवणकर यांचे दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले आहे. या अनुषंगाने वरील पॉलिसी अंतर्गत एलआयसीने १० लाख रूपयांचा क्लेम मंजूर केला आहे.
‘अनुकंपा’चा महत्त्वपूर्ण निर्णय
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्मचारी हित डोळ्यासमोर ठेवून कायम अनेकविध योजना राबविल्या आहेत. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचे होणारे नुकसान कधीही भरून येणारे नसते. तथापि अशा दुर्दैवी प्रसंगात कुटुंबीयांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. यासाठी बँकेने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेतला असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांसाठी इतरही विमा योजना
बँकेच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारच्या इतरही विमा योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्याचा कोणत्याही कारणाने नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकूण २३ लाखापर्यंत आणि अपघाती मृत्यू झाल्यास एकूण २९ लाखांपर्यंत आर्थिक मदत वारसाला प्राप्त होणार आहे. याशिवाय बँक कर्मचारी यांच्या जिल्हा बँक स्टाफ सोसायटी व कृषी बँक कर्मचारी सोसायटी या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून संस्था सभासद कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास दोन्ही संस्थेकडून एकत्रित ८ लाख मदत दिली जाते. त्याचप्रमाणे पीएमएसबीवाय व पीएमजेजेबीवाय विमा योजनेतून प्रत्येकी २ लाख आणि बँकेने सुरु केलेल्या 'सातारा जिल्हा बँक सॅलरी पॅकेज' योजने अंतर्गत ३० लाख रूपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे वरील सर्व योजनांचा विचार करता बँक कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकत्रित ३३ लाखापर्यंत आणि अपघाती मृत्यू झाल्यास एकत्रित ६९ लाखापर्यंत आर्थिक मदत वारसाला प्राप्त होणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली.
याप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, व्यवस्थापक राजेंद्र भिलारे, वाय. जे. साळुंखे, उपव्यवस्थापक महेश शिंदे, अधिक्षक श्रीकांत मोहिते, विकास अधिकारी सचिन अनपट, एलआयसी सातारा शाखेचे व्यवस्थापक संतोष गायकवाड, बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या