वन विभागाची वाई तालुक्यात मोठी कारवाई; दोन वाहनेही हस्तगत
Satara News : सातारा जिल्ह्यात सुरूर फाटा ते वाई दरम्यानच्या रस्त्यावर सापळा रचून पाच शिकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले, तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींकडून विक्रीसाठी घेऊन निघालेले जिवंत खवल्या मांजर ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एक महेंद्रा झायलो गाडी व एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
दिलीप बाबुराव मोहिते (वय ५०, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा), वसंत दिनकर सपकाळ (वय ५०, रा. धावडी, ता. वाई, जि. सातारा), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (वय ३४, रा. भालेकर, ता. वाई, जि. सातारा), प्रशांत भीमराव शिंदे (वय ४४, रा. शिरगाव, ता. वाई, जि. सातारा), अक्षय दिलीप मोहिते (वय २३, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ असे जिवंत खवल्या मांजर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वाई ते सुरूर फाटा रस्त्यावर हॉटेल वाई वेस्टर्न फूड मॉलजवळ सापळा रचण्यात आला होता. आरोपींनी सुरूवातीला जिवंत खवल्या मांजर पोत्यात घालून लपवून ठेवलेल्या जागेवरून दुचाकीवरून काही अंतर आणले व नंतर चार चाकी वाहनातून पुढे घेऊन आले.
या चार चाकी गाडीमध्ये विक्रीसाठी आणलेले जिवंत खवल्या मांजर असल्याची खात्री झाल्यावर तात्काळ झटापट करून पाच जणांना अटक करण्यात आली, तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. या आरोपींनी यापूर्वीही असे अनेक कारनामे केले असल्याचे समजते. अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईमध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथक सचिन डोंबाळे, वाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झाझुर्णे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, वनरक्षक विजय भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, पोलीस कॉन्स्टेबल सुहास पवार, वाहन चालक दिनेश नेहरकर सहभागी झाले होते.
खवल्या मांजराला वाघाइतकेच संरक्षण
खवल्या मांजर ही एक दुर्मिळ सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत या प्राण्याला वाघाएवढेच संरक्षण दिले गेले आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी या प्राण्यांची होते. वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार या गुन्ह्यासाठी सात वर्ष सक्त कारावास व १० हजार रुपये दंड अशी तरतूद आहे. नागरिकांनी आपल्या आजुबाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असल्यास गुप्त माहिती नजीकच्या वनविभागास कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व योग्य बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या