Satara News : सातारच्या ग्रेड सेपरेटरचे झाले ‘अधिकृत’ लोकार्पण


उदयनराजे यांनी पंधरा दिवसांपूर्वी केले होते गनिमी काव्याने उद्घाटन
 

Satara News : पंधरा दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी गनिमी काव्याने उद्घाटन करून वाहतुकीस खुल्या केलेल्या सातारा येथील ग्रेड सेपरेटरचे आज शासनाच्या वतीने 'अधिकृत' उद्घाटन करण्यात आले. निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही उदयनराजे यांनी सोहळ्याला दांडी मारली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - मिंबाळकर यांच्या हस्ते व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सातारा शहरातील अत्यंत मोक्याचे ठिकाण असलेल्या व सात रस्ते एका ठिकाणी मिळणार्‍या पोवई नाक्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सुमारे ७६ कोटी खर्चून हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला आहे. महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाचे कमी वेळेत व दर्जेदार बांधकाम करणार्‍या टी अँड टी इन्प्रâा या कंपनीने सातारच्या ग्रेड सेपरेटरचे ऐतिहासिक काम साकारले आहे. काम पूर्ण होऊनही उद्घाटन लांबणीवर पडत चालल्याने लोकांना त्याचा उपयोग करता येत नव्हता. म्हणून पंधरा दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे यांनी गनिमी काव्याने उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला होता. आज शासनाच्या वतीने ग्रेड सेपरेटरचे वाजतगाजत लोकार्पण करण्यात आले. 

याप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अधिक्षक अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, सुनिल माने हेही उपस्थित होते.

सातारच्या वेभवात भर पडेल 

सातारच्या वाहतुकीतील अनेक वर्षांची समस्या या ग्रेड सेपरेटरमुळे सुटणार आहे. या ग्रेड सेपरेटरची देखभाल व्यवस्था उत्तम करावी, जेणेकरून स्वच्छता राहील आणि शहराच्या वैभवात भर पडेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी यावेळी केले. पोलीस विभागाच्या माध्यमातून या ग्रेड सेपरेटरमध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे सांगून, केंद्र शासनाने व राज्य शासनाने ग्रेडसेपरेटरला निधी दिल्याबद्दल रामराजे यांनी अभिनंदन केले.

अलिकडच्या काळात वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यातूनच ग्रेड सेपरेटरची संकल्पना पुढे आली. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने ६० कोटी व राज्य शासनाने १६ कोटी दिले आहेत. ग्रेड सेपरेटरचे काम चांगल्या पध्दतीने झाले असून देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना सातारा नगरपरिषदेला दिल्या आहेत, असे बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. ग्रेडसेपरेटरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बाहेर मोठी स्क्रीन लावल्यास आतील हालचालींवर लक्ष ठेवता येईल, अशी सूचना त्यांनी केली.

मुंबईनंतर सातारा शहरात मोठे काम

मुंबईनंतर मोठे ग्रेडसेपरेटरचे काम आपल्या सातारा शहरात झाले आहे ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या ग्रेड सेपरेटरचे देखभाल आतील सुरक्षा या दृष्टीने काम केले पाहिजे. ग्रेड सेपरेटरमुळे शहरातील गर्दी टाळण्यास मोठा उपयोग झाला आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांचेही भाषण झाले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते या प्रकल्पात योगदान देणार्‍या टी अँड टी इन्प्रâा कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या