स्वच्छता अभियानांतर्गत बँकेतर्फे ग्रामपंचायतीला अडिच हजार डस्टबिन प्रदान
Satara News : कराड अर्बन बँकेला मसूरकरांनी प्रथमपासून भक्कम पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच बँकेचे मसूरशी जिवाभावाचे नाते आहे. या भावनेतूनच बँकेने मसूरसाठी नेहमीच सढळपणे मदत केली आहे. या सेवाकार्याच्या निमित्ताने बँक घरोघरी पोहोचली आहे, असे प्रतिपादन अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी केले.
बँकेतर्फे स्वच्छता अभियानांतर्गत कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीला अडिच हजार डस्टबिन प्रदान करण्यात आली. याचवेळी बँकेच्या वतीने बँक ग्राहकांना जेसीबी व ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, संचालक आनंदराव पालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तळमळ पाहूनच मदतीसाठी पुढाकार
गावच्या विकासाची इच्छाशक्ती असल्यास कोणी ना कोणी मदतीला उभे राहतात. त्याप्रमाणे अर्बन बँक चांगल्या गोष्टी घडत राहतात. ही तळमळ पाहूनच अर्बन बँक मदत करत आहे, असे सांगून, पूर्वी गावात असलेली शाखा गावाबाहेर आणण्याचे धाडस बँकेने केले, ते पाऊल दूरदर्शीपणाचे ठरले आहे. मसूरचा विकास आणि विस्तार होत असून या प्रगतीत कराड अर्बन बँकेचाही सहभाग आहे, असे सुभाषराव जोशी म्हणाले. आपल्या गावाजवळ कचरा डेपो नको म्हणून संघर्ष होतात. पण आजुबाजुच्या गावातील कचरा व्यवस्थापनाचा विचार या ठिकाणी केला जात आहे हा खूप मोठा बदल आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
कराड अर्बन बँक सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कराड, मसूर, पुसेगाव, वडूज तसेच म्हसवड आदी ठिकाणी मागणी आल्यानंतर त्याप्रमाणे लहान - मोठ्या आकाराचे डस्टबिन मोठ्या प्रमाणात देऊन बँकेने स्वच्छता अभियानात योगदान दिले आहे. याशिवाय अपंग, पूरग्रस्तांना बँकेने मदत केली आहे. ग्रंथ तुमच्या दारी, वृक्षारोपन यासारखे उपक्रम बँक राबवत आली आहे. कोरोना काळात बँकेने ५० पोर्टेबल मशिनच्या माध्यमातून पाचशे लोकांचे प्राण वाचवले आहेत, असे सीए दिलीप गुरव यांनी यावेळी सांगितले.
अर्बन बँकेमुळे व्यापाराला चालना
राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते, त्यानंतर सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी काय करता येईल, कोणत्या योजना आणता येतील हीच आमची भूमिका राहिली आहे. पदाधिकारी व अधिकारी एकदिलाने काम करत असल्यावर काय होऊ शकते याचे मसूर हे उत्तम उदाहरण आहे, असे मानसिंगराव जगदाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. कराड अर्बन बँकेमुळे मसूरच्या विकासाला, व्यापाराला चालना मिळाली आहे. बँकेकडून मसूरला असेच पाठबळ मिळत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सरपंच पंकज दीक्षित, बसवेश्वर चेणगे यांचीही समयोचित भाषणे झाली. शाखा व्यवस्थापक अमर भोकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले. आभार यांनी मानले.
कार्यक्रमास सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक लहूराज जाधव, महेश वेल्हाळ, अतुल शिंदे, दीपक आफळे, शहाजी जगदाळे, मसूर आरोग्य केंद्राचे वेद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, अॅड. रणजितसिंह जगदाळे, आर. पी. साळुंखे, विनोद जगदाळे, सुनील जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या