Satara News : पुण्यातील पैलवानांवर कराडजवळ काळाचा घाला


कुस्तीपंढरीतून परतताना तिघांचा दुर्दैवी अंत; अन्य सहाजण जखमी

Satara News : कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या इनोव्हा व स्विफ्ट डिझायर या दोन वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील तीन कुस्तीगीरांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात अन्य सहा - सातजण जखमी झाले. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडपासून सहा किलोमीटर अंतरावर पाचवड फाट्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

इनोव्हा कारमधून पुण्यातील काही पैलवान कुस्तीगीर परिषदेच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. सायंकाळी पुण्याला परतत असताना साडेसहाच्या सुमारास त्यांची इनोव्हा कार पाचवड फाट्याजवळ आली. त्याचवेळी पुण्याच्याच दिशेने निघालेल्या स्विफ्ट डिझायर कारला जोरदारपणे घासली गेल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ही कार रस्त्याकडेच्या माईलस्टोनला धडकत जावून बाजुच्या झाडावर जावून आदळली. 

अपघाताचे दृश्य थरकाप उडवणारे

या अपघाताचे दृश्य अंगाचा थरकाप उडवणारे होते. अपघातस्थळी गर्दी झाल्याने महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात इनोव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्यातील तीन कुस्तीगीरांचा मृत्यू झाला. राहुल प्रल्हाद दोरगे (वय २८, रा. यवत), स्वप्नील चंद्रकांत शिंदे (वय २१, रा. कात्रज, पुणे) व रवी भाऊ साळुंखे अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात तुषार गावडे (वय २३, रा. कात्रज), आदित्य ओमासे (वय १६), चंद्रकांत कावरे (वय ७६), पूजा ओमासे (वय ४०), भरत ओमासे (वय ४५), सेजल ओमासे (वय १८, सर्व रा. कलास, ता. इंदापूर, जि. पुणे), गणेश काळे हे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ कराडला हलवण्यात आले आहे. स्विफ्ट डिझायरमधील लोक इंदापूर येथील असून ते देवदर्शन करून परतत होते असे वृत्त आहे.

अपघाताचे वृत्त समजताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महामार्ग पोलीस, वाहतुक पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, उदय यादव, मधुकर साळुंखे आदिंनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत केली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या