जिल्ह्यात ६५२ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान; यंत्रणा सज्ज
Satara News : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेले काही दिवस सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी थांबली आहे. जाहीर प्रचार आता थंडावला असून पडद्यामागच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मतदानाच्या माध्यमातून आपल्यावर 'संक्रांत' येऊ नये म्हणून बऱ्याच ठिकाणी घराघरात 'वाण' देण्याची पर्वणी साधली गेली आहे. निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यात एवूâण ८७८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गेले महिनाभर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रित असल्याने निवडणुका बिनविरोध करण्याच्या कल्पनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात ११८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून तीन ग्रामपंचायती अशा आहेत, की त्या ठिकाणी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्जच दाखल केलेला नाही.
६५२ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
ग्रामपंचायतींच्या एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान न होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या १०५ इतकी आहे. जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी दि. १५ रोजी मतदान पार पडत आहे. निवडणूक होणाऱ्या एकूण जागांची संख्या ७२६४ इतकी आहे. एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची संख्या ३८६ इतकी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने बिनविरोध झालेल्या जागांची संख्या २६४८, तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या जागांची संख्या ४२३० इतकी आहे.
निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तुफान रणधुमाळी पहायला मिळाली. चौकाचौकात बॅनर, घरोघरी पत्रके, रस्तोरस्ती वाहनातून ध्वनीक्षेपकावरून प्रचार यामुळे एकूणच वातावरण ढवळून निघाले होते. काही ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून हायटेक प्रचारही केला गेला. आज जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी पडद्यामागच्या प्रचाराला कमालीची गती आली आहे.
मतांचे दान कोणाला याची उत्सुकता
अत्यंत अटीतटीच्या लढती असलेल्या ठिकाणी मतदारांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांना धाबे खुले होते, तर घरच्या मंडळींसाठी मटणाची किलोकिलोची पाकिटे पोहोच केली गेली. तसेच राजकीय कारकिर्दीवर 'संक्रांत' येऊ नये म्हणून काही उमेदवार व पॅनेलनी मकर संक्रांतीचे निमित्त साधून घरोघरी'वाण' पाठवले आहेत. आता मतदार राजा कोणाच्या ओट्यात मतांचे 'दान' टाकतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या