महाव्यवस्थापक येणार असल्याने घेतला दुहेरीकरण - विद्युतीकरण कामाचा आढावा
Satara News : मध्य रेल्वेच्यावतीने सातारा ते कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी तसेच वार्षिक तपासणी या महिन्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी करणार असल्याने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी सातारा, कराड, सांगली, मिरज स्थानकासह रेल्वे ट्रॅकची पाहणी केली. यावेळी ज्या ज्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशा सूचना रेणू शर्मा यांनी रेल्वेच्या अधिकार्यांना दिल्या.
मध्य रेल्वेच्या सातारा - पुणे विभागाची वार्षिक तपासणी गतवर्षी जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्यासह मध्य रेल्वेच्या सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केली होती. याच धर्तीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जानेवारीमध्ये सातारा ते कोल्हापूर मार्गाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे या मार्गावर मध्य रेल्वेकडून विविध कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. पुणे - मिरज - कोल्हापूर या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मध्य रेल्वेमार्फत युध्दपातळीवर सुरु आहे. कोल्हापूर ते मिरज या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मिरज ते सातारा मार्गाचे तसेच रेल्वेच्या सिग्नल व टेलीकॉम डिपार्टंमेंटचे काम सुरु आहे.
त्रुटींची दुरूस्ती करण्याचे आदेश
पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्यासह विविध विभागाच्या अधिकार्यांनी विशेष रेल्वेने सातारा, कराड, मिरज, सांगली या रेल्वे स्थानकांसह ठिकठिकाणी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. सातारा ते मिरज रेल्वे दुहेरी मार्गासह विद्युतीकरण, पूल यांची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी कामामध्ये त्रुटी आढळून आल्या. या कामांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्यांना दिले.
मसूर रेल्वे गेटची तपासणी
मसूर, तारगावनजीक असलेल्या गेटची त्यांनी तपासणी केली. सातारा रेल्वे स्थानकात विशेष रेल्वे काही वेळ थांबली होती. मात्र त्यानंतर विशेष रेल्वे पुण्याकडे रवाना झाली. पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचा सातारा ते मिरज अशा विशेष रेल्वेने दौरा झाला असल्याने लवकरच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांसह विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचा दौरा होण्याची शक्यता आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या