Satara News : दुसर्‍यावर बालंट आणण्यासाठी केला आईचा खून


फलटण तालुक्यातील प्रकरण नव्या वळणावर; मुलगा - सून आरोपीच्या पिंजर्‍यात

Satara News : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे वृद्धेचा खून करुन झोपडी जाळल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने छडा लावला आहे. जमिनीचा वाद असल्याने ज्यांच्याशी वाद आहे, त्यांना तुरूंगात टाकले की आपला मार्ग मोकळा होईल या (अ) विचारातून स्वत: खून करून दुसर्‍यावर बालंट आणले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुलगा व सुनेसह अन्य नातेवाईकांनीच कट रचून वृद्ध सावत्र आईचा खून केल्याचे पुढे आल्याने हे प्रकरण नवीन वळणावर आले आहे. खुनाची फिर्याद देणारी सूनच या गुन्ह्यात संशयित बनली आहे.

याप्रकरणी अगोदर अटक केलेल्या संशयिताचा अहवाल न्यायालयाला पाठवल्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कल्पना अशोक पवार (यापूर्वीची फिर्यादी), अशोक झबझब पवार, कमांडो ऊर्फ किमाम अशोक पवार, गोपी अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल ऊर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (सर्व रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

... यासाठी रचले कुभांड 

पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंप्रदच्या हद्दीत झबझब पवार याने २० गुंठे जमीन खरेदी केली होती. परंतु, त्यावर या जमिनीतील सामाईक हिस्सेदारांनी आक्षेप घेतला होता. त्यावरुन पवार व गावातील भगत व मोरे यांच्याशी वाद होता. त्यावरुन त्यांच्यात सतत भांडणे होत होती. त्यामुळे झबझब पवारचा मुलगा, सून व अन्य नातेवाईकांनी महुली झबझब पवार या वृद्धेचा खून करुन त्याचा आळ भगत व मोरे कुटुंबीयांवर टाकण्याचा कट रचला. खुनाच्या गुन्ह्यात ते आत गेल्यावर जमीन कसायला आपण मोकळे होऊ असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी बुधवारी दि. १० वृद्धेच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले. ती बेशुद्ध असतानाच त्यांनी ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून तिला पेटवून दिले. याप्रकरणी कल्पना पवार हिने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनील मोरे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा.पिंप्रद) यांना अटक केली होती.

तपासादरम्यान पोलिसांना फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळली. त्यामुळे तपासाची दिशा बदलली. अधिक चौकशीत घटनेनंतर पवार कुटुंबातील दोघे पसार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी महुली यांच्या खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर फिर्यादीसह अन्य संशयितांना अटक करण्यात आली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या