बेळगावात सापडलेल्या व्यक्तीला सीमाबांधवाने स्वखर्चाने पोहचवले घरी
Satara News : फेसबुक, व्हॉटसअॅप यासारख्या माध्यमांच्या सकारात्मक उपयोग करून घेतल्याने घरातून बेपत्ता झालेल्या व परमुलखात अन्नपाण्यावाचून निपचित पडलेल्या व्यक्तीला पुन्हा त्याचे घर सापडले आहे. बेळगाव येथील एका जिगरबाज युवकाने त्याचे प्राणही वाचवले आणि त्याला खाऊपिऊ घालून सुखरूपपणे स्वखर्चाने त्याच्या घराकडे आणले. त्याच्यामुळे मायलेकराची गाठभेट झाली.
१९ मार्च रोजी बेळगाव येथे बरेच दिवस उपाशी पोटी असल्याने निपचित पडलेली 'ही' व्यक्ती बेळगाव येथील विनायक केसरकर या तरूणाला दिसली. त्याने या व्यक्तीला घरी आणून केस कापून, आंघोळ घालून नीटनेटके केले. त्यानंतर त्यांचा पत्ता विचारला असता थोडेसे मतिमंद असणार्या या व्यक्तीने आपले नाव संजय माने असल्याचे व पत्ता रहिमतपूर पाचवी गल्ली असल्याचे सांगितले.
व्हीडीओ केला सोशल मीडियावर व्हायरल
या माहितीच्या आधारे विनायक केसरकर याने बेळगाव येथे वयस्कर व्यक्ती सापडल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत संबंधित व्यक्तीची माहिती दिली होती. व्हॉटसअप, फेसबुकच्या माध्यमातून युजर्सनी पटापटा व्हीडीओ शेअर करत तो अनेकांपर्यंत पोहचवला. संबंधित व्यक्ती संजय माने असून पाचवी गल्ली असा पत्ता दिल्याने रहिमतपूरकर शोध घेत असताना रहिमतपूरमध्ये पाचवी गल्ली नसल्याने गोंधळ उडाला होता.
'आपलं रहिमतपूर' या फेसबुक पेजवरुन प्रेम भोसले या युवकाने रहिमतपूरच्या परिसरातील गावागावात हा व्हीडीओ पोहोचवला. त्यावेळी किरोली (ता. कोरेगाव) येथील तरुणांनी ही व्यक्ती आपल्याच गावची असल्याची माहिती प्रेम भोसले यांना दिली. भोसले याने सोशल मीडियावरुन बेळगावच्या युवकाचा शोध घेतला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संजय माने यांच्या आईंनी मिसिंगची तक्रार दिली होती.
पोलिसांकडून केसरकर यांचे कौतुक
अचानक बेळगावात मिळालेले संजय माने गावकर्यांसह, पोलीस यंत्रणेला चक्रावून टाकणारे असल्याने कोव्हीडमुळे बेळगावला येणार्या नातेवाईकांना थांबवून विनायक केसरकर माने यांना स्वत: घेऊन आले. सातार्यात आल्यावर तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी केसरकर याचे अभिनंदन केले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोलिसांनी संजय माने यांना त्यांच्या आईकडे सोपवले.
विनायक केसरकर हा आयटीआय असणारा तरुण सध्या बेळगावात तायक्वांदो प्रशिक्षण देतो. तसेच तो प्राणिमित्र, सामाजिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत त्याने हरवलेल्या एकोणीस व्यक्तिंना त्यांचे घर शोधण्यात मदत केली आहे. नेपाळमधून हरवलेल्या एका व्यक्तीलाही घरापर्यंत पोहवण्यासाठी मदत केल्याचे केसरकर याने सांगितले. सोशल मीडियाचा अशा पध्दतीनेही चांगला उपयोग करून घेता येतो हे केसरकर या जिगरबाज युवकाने दाखवून दिले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या