पाच वर्षांपूर्वी खंबाटकी बोगद्याकडे विरूध्द बाजुने आल्याने झाला होता अपघात
Satara News : पाच वर्षांपूर्वी सातारा ते पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्याकडे विरूध्द बाजुने लक्झरी बस आणून अपघातास, एकाच्या मृत्यूस व ४५ प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकरणी बसचालक विजय एकनाथ चोरगे (वय २९, रा. येवती, ता. कराड) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी चार वर्षे सक्तमजुरी व ४१०० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
याबाबतचे वृत्त असे, दि. २२ नोव्हेंबर २०१५ रोजी विजय एकनाथ चोरगे हा आपल्या ताब्यातील लक्झरी बस (एमएच ०४ जीपी ३५३५) मुंबई ते सांगली जिल्ह्यातील चांदोली अशी घेऊन येत होता. खंबाटकी घाटात एकेरी वाहतुक असताना सायंकाळी साडेचारच्या सुमारास चोरगे याने खंबाटकी बोगद्याकडे विरुध्द दिशेने ही बस भरधाव वेगात चालवून समोरून येणार्या लक्झरी बसला (एमएच ०७ जीपी ९७७७) समोरासमोर धडक दिली. या अपघातात दीपक शिवाजी निकम (वय ४०, रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला व दोन्ही बसमधील ४५ प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले. तसेच दोन्ही लक्झरी बसचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. या अपघाताची खबर पोलिसांना न देता व जखमींना औषधोपचारास न नेता चालक चोरगे पळून गेला.
जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी
याबाबतची फिर्याद सोमनाथ अशोक धुमाळ (लक्झरी बसचालक, रा. सर्कलवाडी, ता. कोरेगाव) यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास खंडाळ्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. बी. शेळके यांनी करून आरोपीविरुध्द सबळ पुरावे तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्यासमोर होऊन न्यायालयाने आरोपी विजय एकनाथ चोरगे यास चार वर्षे सक्तमजुरी व ४१०० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून आशीर्वाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कुंभार तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उर्मिला घारगे, पोलीस हवालदार शमशुद्दिन शेख, कांचन बेंद्रे, अनिल शिंदे, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी खटल्यात सरकारी वकील यांना सहकार्य केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या