अफवांवर विश्वास न ठेवता, न घाबरता लस घेण्याचे नागरिकांना आवाहन
Satara News : कराड तालुक्यातील मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ कराड पंचायत समितीच्या माजी सभापती शालन माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्या तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती सदस्या संगीता साळुंखे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच तथा जिल्हा सनियंत्रण समिती सदस्य विजयसिंह जगदाळे, सुदाम दीक्षित, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे व कर्मचारी उपस्थित होते. दिलीप पाटील यांच्यापासून मसूरच्या या लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.
लस घेऊन स्वत:चे संरक्षण करा
प्रास्ताविकात डॉ. लोखंडे म्हणाले, मधुमेह, रक्तदाब, दमा यासारखे व इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील लोकांना ही लस घेता येईल. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून वरील वयोगटातील सर्व नागरिकांनी ती घेऊन स्वत:चे कोरोनापासून संरक्षण करावे. मात्र गरोदर माता, स्तनदा माता व १८ वर्षाखालील व्यक्तींना ही लस देता येणार नाही.
या लसीकरणानंतर किरकोळ अंगदुखी व सौम्य ताप येण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व नागरिकांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करावी, असे आवाहन डॉ. लोखंडे यांनी यावेळी केले.
न घाबरता लस घ्या - जगदाळे
भविष्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी न घाबरता ही लस घ्यावी व स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन मानसिंगराव जगदाळे यांनी यावेळी केले. ग्रामीण भागातील लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता ही लस घ्यावी, असे आवाहन संगिता साळुंखे यांनी केले. ही लस देण्यासाठी उपलब्ध असलेल्या व यापूर्वी कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या डॉ. रमेश लोखंडे व त्यांच्या स्टाफचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. डॉ. राजेंद्र डाकवे यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या