Satara News : अधिक प्रमाणात आधुनिकीकरण करुन उत्तम सेवा देणार


सातारा जिल्हा बँकेच्या ७० व्या वार्षिक सभेत रामराजे नाईक - निंबाळकर यांची ग्वाही

Satara News : विकास संस्था सक्षम करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सतत प्रयत्नशील आहे. विकास संस्थांनी कामकाज पध्दतीमध्ये सुधारणा करुन संस्था नफ्यात येतील यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करून, सध्या आयटीचे युग असल्याने बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या बँकेमध्ये भविष्यात अधिक प्रमाणात आधुनिकीकरणाचा वापर करुन ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी दिली.

जिल्ह्यातील सहकाराची मातृसंस्था, राज्यात व देशात आपल्या उत्कृष्ठ कार्यपध्दतीने श्रेष्ठ असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७० वी वार्षिक साधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळविलेल्या सूचनांप्रमाणे तालुक्याच्या विभागीय कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत शनिवारी पार पडली. या सभेत रामराजे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे सहकारमंत्री व बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहकारी बँकिंग क्षेत्रात नावलौकिक

बँकेच्या भाग भांडवल, ठेवी, कर्ज, सुयोग्य गुंतवणूक व कर्ज वसुली इत्यादीमध्ये झालेली वाढ यामुळे बँकेला अहवाल वर्षात विक्रमी नफा झालेला आहे. बँक स्थापनेपासून सतत नफ्यात आहे व ऑडीट अ वर्गात आहे. बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. सातारा जिल्हा बँक बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९-२० च्या ढोबळ नफ्यातून बँकेने १ कोटीचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि जिल्ह्यातील स्थलांतरित, मोलमजुरी करणारे मजूर / शेत मजूर व गरजू कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे किट उपलब्ध करुन दिले असून यासाठी बँकने अंदाजित १ कोटी रूपये खर्च केलेले आहेत, अशी माहिती रामराजे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.  

बँकेच्या योजनांचा सभासदांना लाभ व्हावा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे अपेक्षित असून थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरु होणे आवश्यक आहे. आपली बँक राज्यातच नव्हे, तर देशात नावलौकिक प्राप्त बँक आहे. या बँकेचा नावलौकिक असाच वाढत राहण्यासाठी आपण सर्वांनी चांगले कामकाज करावे, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले. बँकेने कोविडच्या कालावधीत चांगले निर्णय घेवून शेतकरी सभासदांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने चांगल्या योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ शेतकरी सभासदांना होणे आवश्यक आहे. शासनाच्या महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेचा शेतकरी सभासदांना चांगला लाभ झाला आहे. तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराची योजना महाराष्ट्र शासनाने शेतकरी सभासदांसाठी आणली आहे. शेतकर्‍यांनी शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता चांगले कामकाज करावे. बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा.

डॉ. सरकाळे यांनी मांडला बँकेच्या प्रगतीचा आलेख

प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेने केलेल्या प्रगतीचा व कार्याचा चौफेर आलेख सभेसमोर मनोगताच्या माध्यमातून मांडला. त्यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. यावेळी त्यांनी बँकेचे वाढते भाग भांडवल, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली, उत्कृष्ट कामकाज, सक्षम व भक्कम आर्थिक स्थिती, विविध व नाविन्यपूर्ण विकास योजना याबद्दल ऊहापोह केला. विकास संस्थांच्या सभासदांनी विविध कर्ज योजना व कामकाजाच्या अनुषंगाने असलेल्या अडीअडचणीसंबंधी सभेत प्रश्न मांडले तसेच काही सूचना केल्या.

सभेस सभासदांची ऑनलाइन उपस्थिती

सभेस बँकेचे संचालक आमदार शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर, खासदार उदयनराजे भोसले, दत्तात्रय ढमाळ, शिवरूपराजे खर्डेकर, राजेश पाटील-वाठारकर, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदिप विधाते, अर्जुनराव खाडे, सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, बँकेचे कर सल्लागार तानाजीराव जाधव, वैधानिक लेखापरीक्षक सत्याजीराव भोसले तसेच बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, व्यवस्थापक, अधिकारी व सेवक तसेच सहकारी संस्थांचे पदाधिकारी / प्रतिनिधी तसेच व्यक्ती सभासद इत्यादि ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शहाजी क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या