महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विचार
Maharashtra News : भारताच्या उत्पन्नात महाराष्ट्राचे सर्वात जास्त म्हणजे पंधरा टक्के योगदान आहे. इथले सहकार प्रारूप देशाने स्वीकारले आहे. मराठी जनतेला इतिहासात संस्कृत, कला याचा प्रदीर्घ आणि समृद्ध वारसा लाभला आहे. परंतु महाराष्ट्रासमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत. त्यावर मात केल्यास पुढील वाटचाल सुकर होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेतील ३९ वे पुष्प गुंफताना 'महाराष्ट्राची ६० वर्षातील वाटचाल आणि पुढील आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. सामाजिक प्रबोधनाची सुरुवात महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाली होती. ब्रिटिश राजवटीत सुद्धा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक सुधारणांना गती देणाऱ्या अनेक चळवळी सुरू झाल्या. सामाजिक प्रबोधनाची सुरूवात संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या लेखणी आणि कीर्तनातून केली. पुढे राजधर्म पाळणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या जाणत्या राजाची या सामाजिक प्रबोधनाला जोड मिळाली. शाहू - फुले - आंबेडकर यांनी विषमतेविरुद्ध बंड पुकारून जागृती निर्माण केली, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र देशात अग्रेसर...
चव्हाण पुढे म्हणाले, की महाराष्ट्राचे सहकार प्रारूप देशातील अनेक राज्यांनी स्वीकारले. बँका, शिक्षण संस्था, शेतीमालावर प्रक्रिया करणारे सहकारी कारखाने, दूध डेअरीसारखे उद्योग, सूतगिरणी, कृषिमाल खरेदी - विक्री संस्था अशा विविध क्षेत्रात राज्य अग्रेसर ठरले आहे. १९७२ च्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्राने रोजगार हमी योजना सुरू केली. पुढे मनरेगाच्या स्वरूपात देशात हा कायदा झाला.
महाराष्ट्राची पुरोगामी धोरणे
महिलांना केंद्रस्थानी मानून अनेक योजना राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. नोकरीत ३० टक्के आरक्षण तर स्थानिक निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्राने दिले आहे. वर्ष २०१३ मध्ये जादूटोणा व अघोरी प्रथा विरोधी कायदा तर २०१६ मध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा करून महाराष्ट्राने आपली पुरोगामी विचारसरणी अधोरेखित केली आहे. दादासाहेब फाळके यांच्यासारखे चित्रपट सृष्टीचे जनक महाराष्ट्रात होते. वैज्ञानिक संशोधनामध्ये होमी भाभा यांनी भारतात अणू विज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. भाभा अनुसंधान केंद्र असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असेल किंवा टाटा कॅन्सर हॉस्पिटल असेल, हे सर्व महाराष्ट्रात आहे. पुण्यामध्ये अनेक शिक्षण संस्था व संशोधन केंद्र आहेत. मागील काही दशकात महाराष्ट्रातील प्रमुख शहरात औद्योगिक वसाहती, सेवाक्षेत्र, महामार्ग, टोलेजंग इमारती, मल्टिप्लेक्स, पंचतारांकित हॉटेल यामुळे राज्यात समृद्धी निर्माण झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रासमोरील आव्हाने
आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत व कोरोना महामारीमुळे सर्वच संदर्भ बदलले आहेत. येणाऱ्या काळात आर्थिक धोरण आखून राज्याच्या शेवटच्या माणसाला त्याचे लाभ कसे पोहोचतील हे ठरवण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.
एका बाजूला समृद्धी दिसून येत असताना दुसNया बाजुला पाणी टंचाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कमी प्रमाणात रोजगार निर्मिती, कूपोषण, बकाल शहरे, वाढत्या झोपडपट्ट्या आणि त्याच्या पुनर्विकासाच्या प्रश्न, नागरी सुविधा, घनकचरा व्यवस्थापन ही नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. राज्याच्या तीन चतुर्थांश उत्पन्न हे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातून येत असल्याकारणाने मराठवाडा, विदर्भ, खानदेश कोकण, उत्तर महाराष्ट्र यामध्ये अन्यायाची भावना आहे आणि या असमतोल विकासामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या राज्यात युवा मनुष्य बळ, समाधानकारक पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, गुणवत्तावान शिक्षण संस्था, जोडीला इंग्रजी भाषा आणि गणित यांच्या आधारे महाराष्ट्राने नॉलेज इकॉनॉमीकडे वाटचाल करायला सुरुवात केली पाहिजे. सार्वजनिक शिक्षण व आरोग्य यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
तीन प्रमुख आव्हाने...
वाढते व अनियोजित नागरीकरण, शाश्वत शेती व युवकांची वाढती बेरोजगारी ही तीन सर्वात मोठी आव्हाने महाराष्ट्रासमोर असल्याचे चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि कालव्याऐवजी पाईपलाईनद्वारे जल वितरण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
उत्पन्नाच्या योग्यवेळी आयात - निर्यात करण्यावर भर देताना त्यांनी शेतकऱ्यांच्या निर्मित कंपन्या जिल्ह्या - जिल्ह्यामध्ये सुरु होण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोजगार वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवीन उद्योग आकृष्ट करण्यामध्ये कमी पडतो आणि यात मूलभूत संशोधन व्हायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. त्यांनी आदिवासी भागातील कूपोषण या विषयावरही भाष्य केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या पिढीला आणि नव्या राजकत्र्यांना महाराष्ट्रात प्रचंड मोठी संधी असल्याचे सांगितले. त्यांनी कोरोनानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे आव्हान नवे नेतृत्व नक्कीच पेलू शकेल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या