सातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी सुरु करा - आमदार शिवेंद्रसिंहराजे
Satara News : कोरोनाचा कहर सुरु असताना सातारा नगरपालिका सुस्त का बसून आहे, असा सवाल करत, सातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी नगरपालिकेने सुरु करावा, असा चिमटा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढला आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ होत आहे. जिल्हा रुग्णालय, जम्बो कोव्हीड सेंटर यासह सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये फुल्ल झाली असून रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या रांगा पहायला मिळत आहेत. अशी भयानक परिस्थिती असताना सातारा नगरपालिकेकडून नागरिकांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नाही.
मोठ्या प्रमाणात रुग्ण होम आयसोलशनमध्ये
सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून शाहूपुरी, शाहूनगर आदी उपनगरे नगरपालिकेत समाविष्ट झाली आहेत. यापूर्वी शाहूपुरीसारख्या ग्रामपंचायती कण्हेर आरोग्य केंद्राशी जोडल्या होत्या. मात्र आता शहराशी जोडल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि उपचाराअभावी रुग्ण दगावत आहेत. होम आयसोलशनमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण असून त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे. घर लहान असेल तर हा धोका वाढत असून बहुदा यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे.
१४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे कोरोना आपत्ती निवारणासाठी खर्च करावेत अशा सूचना शासनाने नगरपालिकेला दिल्या आहेत. रहिमतपूरसारख्या छोट्या नगरपालिकेने तेथील नागरिकांसाठी कोरोना केअर सेंटर सुरु केले असून अगदी बेड, लाईट व्यवस्था, ऑक्सिजनसह सर्व सुविधा या सेंटरसाठी या नगरपालिकेने दिल्या आहेत. रहिमतपूरसारखी छोटी नगरपालिका नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत असेल तर शासनाने सूचना देऊनही सातारासारखी मोठी अ वर्ग नगरपालिका थंड का पडली आहे, हा खरा प्रश्न आहे.
काहीतरी सुविधा देणे अपेक्षित होते
सातारा शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी नगरपालिकेने काहीतरी सुविधा देणे अपेक्षित होते. सातारा शहर आणि आसपासच्या परिसरात मोठमोठी मंगल कार्यालये आहेत. नगरपालिकेचे स्वत:चे मंगल कार्यालय आहे. अशा ठिकाणी रुग्णांसाठी किमान आयसोलेशन वार्ड तरी नगरपालिकेने सुरु केल्यास त्याचा सातारकरांना फायदा होईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
आरोग्य उपसंचालक पदाचा फायदा करून घ्या
सर्व प्रकारच्या प्रकारच्या उपलब्धी असताना नगरपालिकेकडून काहीही सुविधा दिली जात नाही यामागचे गौडबंगाल काय असावे? नगराध्यक्षा माधवी कदम यांचे पती डॉ. संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक आहेत. याचा तरी फायदा माधवी कदम यांनी सातारकरांना करून द्यायला हवा होता. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. नगरपालिकेने आपली जबाबदारी ओळखून सातारकरांना दिलासा मिळवून द्यावा, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
लक्ष घालण्याची उदयनराजेंना विनंती
परवाच खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून कोरोना संदर्भात बैठक घेतली. आता खासदार उदयनराजेंनीच या प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. तुमच्याशिवाय नगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक हलणार नाहीत. त्यामुळे तुम्हीच आता काहीतरी करा आणि सातारकरांसाठी नगरपालिकेमार्फत एखादी तरी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती त्यांनी खासदार उदयनराजेंना केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या