हरवलेल्या व्यक्तीचा काही तासातच शोध घेऊन घडवले माणुसकीचे दर्शन
Satara News : लोकांना पोलिसांची कडक भाषा खुपते, काहीवेळा त्यांची कार्यपध्दती योग्य वाटत नाही, काहीवेळा त्यांच्याकडून मिळणाऱ्या कठोर वागणुकीची चीड येते... पण असेही काहीवेळा घडते, की त्यांच्यातील माणुसकीच्या भावनेला सॅल्यूट करावा वाटतो. असेच एक हृदयस्पर्शी उदाहरण साताऱ्यात पहायला मिळाले. पोलिसांनाही मन आहे, हृदय आहे, वात्सल्य आहे आणि भावनाही आहेत हे या उदाहरणाने दाखवून दिले. लोकांनी त्यांच्या याही पैलूची जरूर नोंद घ्यायला हवी.
त्याचे झाले असे, प्रवीण जमदाडे या युवकाच्या बावधन (ता. वाई) येथे राहणाऱ्या आजीला पंधरा दिवसांपूर्वी उपचारासाठी कृष्णानगर कॉलनी (सातारा) येथे त्याच्या आईकडे आणले होते. प्रवीणचे थोडे वेडसर असलेले मामा अशोक हरीभाऊ जायकर (वय ५८) हेही आजीसोबत आले होते. शनिवारी दुपारी १ वाजता ते कोणालाही न सांगता कृष्णानगर कॉलनी येथील घरातून निघून गेले. कुटुंबियांनी जवळपासची मंदिरे, बाँबे रेस्टॉरंट चौक, एमआयडीसी रस्ता अशा सर्व ठिकाणी शोधाशोध करूनही ते न सापडल्याने प्रवीणच्या आईने नुने (ता. सातारा) येथे असलेल्या प्रवीणला बोलावून घेतले. त्यानंतर प्रवीणने त्याचे मित्र हुसेन मोमीन यांना बरोबर घेऊन कॉलनीचा सर्व परिसर, रेल्वे स्टेशन, सातारा एसटी स्टँड, वनवासवाडी परिसर पालथा घातला. पण मामा सापडले नाहीत. प्रवीणचे अन्य मित्र उमेश महामुनी, गणेश रोडे, राहुल भिसे, प्रवीण लोखंडे यांनीदेखील खिंडवाडी ते वाढे फाट्यापर्यंत शोध घेतला. पण सर्वांच्या पदरी निराशाच आली.
... आम्ही तर पुण्याईचे काम केले !
त्यानंतर या सर्वांनी बाँबे रेस्टॉरंट पुलाखालील पोलीस चौकीत असलेल्या राहुल दळवी यांना भेटून झालेली घटना सांगितली. त्यावर त्यांनी अजून काहीवेळ शोध घेऊन नंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले. तसेच त्यांनी मामांचे फोटो आणि वर्णन घेऊन पीसीआर ग्रूपवर टाकले. पोलिसांना कुठे दिसले तर कळवतो असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात जावून तेथेही चौकशी केली आणि नंतर बसस्थानकाशेजारी सेव्हन स्टार काँप्लेक्सजवळ कार्यरत असलेले वाहतुक पोलीस कर्मचारी आनंदराव भोसले यांना गाठून मामांना शोधण्याची विनंती केली. त्यांनी तात्काळ सर्व माहिती पोलीस दलाच्या सर्व व्हाट्सअप ग्रूपवर पाठवली. तसेच धीर देऊन मामा नक्कीच सापडतील अशी खात्री त्यांना दिली.
त्यानंतर प्रवीण व हुसेन मोमीन कोरेगावच्या दिशेने शोधण्यासाठी गेले. ल्हासुर्णे फाट्याजवळ असताना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. ते वाहतुक शाखेचे कर्मचारी दीपक कांबळे होते. 'तुमचे मामा मोळाचा ओढा येथे सापडले आहेत, आम्ही त्यांना पाणी आणि खायला दिले आहे, काळजी करू नका' असे त्यांनी सांगितले. पाठोपाठ आनंदराव भोसले यांचाही फोन आला. लगेच सर्वजण मोळाचा ओढा या ठिकाणी पोहोचले. मामांना पाहून त्यांचे डोळे पाणावले. तिथे असणारे वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार दीपक कांबळे, राजाराम भोसले, आनंदराव भोसले आणि सैदापूरचे पोलीस पाटील दत्ता पाटील यांनी मामांना एका ठिकाणी बसवून पाण्याची बाटली आणि केळी खायला दिली होती. कोरोना काळातही पोलिसांनी दाखवलेली ही माणुसकी पाहून सर्वजण भारावून गेले. मदतीचा मोबदला म्हणून काही देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. 'आम्ही हे पुण्याईचे काम केले आहे, आम्हाला काही नको' असे त्यांनी सांगितले, तेव्हा त्यांच्यातील देवाचे दर्शन झाल्याची भावना जमदाडे यांनी व्यक्त केली.
... तर आजीने जीव सोडला असता !
आज जर आमचे एकुलते एक मामा सापडले नसते, तर माझ्या ९० वर्षाच्या आजीने नक्कीच जीव सोडला असता आणि ही हुरहूर माझ्या आईच्या जीवाला नक्कीच लागली असती. सातारा शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार आणि त्यांचे सहकारी आनंदराव भोसले, राजाराम भोसले, दीपक कांबळे, सैदापूरचे पोलीस पाटील दत्ता पाटील यांचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही.
- प्रवीण जमदाडे (हरवलेल्या अशोक जायकर यांचे भाचे)
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या