Satara News : कोरोना लढ्यासाठी जिल्हा बँकेची ३ कोटींची मदत


उत्तम दर्जाचे २५ व्हेंटिलेटर व २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

Satara News : कोरोनात व्हेंटिलेटर बेडविना रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. यावर्षी शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच कोविड सेंटरला बँकेकडून तीन कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले व ज्येष्ठ संचालक, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बँकेस या आर्थिक वर्षात १४९.२२ कोटींचा करपूर्व नफा झाला असून, करोत्तर १०७ कोटी ३६ लाखाचा नफा झाला आहे. बँकेच्या नफ्यातून व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी डॉक्टरांची समिती गठित करण्यात आली आहे. उत्तम दर्जाचे २५ व्हेंटिलेटर व २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पंधरा दिवसात ते जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत, असे आमदार शिवेंद्रराजे व सभापती रामराजे यांनी सांगितले.

कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी मदत

बँकेने शेतकऱ्यांना एक ते तीन लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध केले आहे. शैक्षणिक कर्जावरील संपूर्ण व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी १ कोटी १ लाख ७९ हजारांची तरतूद केली आहे. बँकेच्या सभासद संस्थांना १५ टक्के लाभांश देण्यासाठी ३३.३३ कोटींची तरतूद केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी झालेल्या करारानुसार १६८ बेरोजगार तरुणांना १४.५६ कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले आहे, असे सांगून, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा बँकेने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा परिषदेची आरोग्य केंद्रे, तसेच कोविड सेंटरला व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी संचालक आमदार शशिकांत शिंदे, अनिल देसाई, नितीन पाटील, कांचन साळुंखे, राजेंद्र राजपुरे, दत्तानाना ढमाळ, राजेश पाटील - वाठारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे तसेच अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कॅशलेस उपचार

यावर्षी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी समूह आरोग्यविमा पॉलिसी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत बँकेचे कर्जदार शेतकरी व त्यांची पत्नी किंवा कुटुंबातील एका सदस्यास गंभीर आणि विशिष्ट आजारासाठी हॉस्पिटल खर्च व शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. या योजनेत कॅशलेस उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या