Satara News : ‘कास’ची उंची वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात


आमदार शिवेंद्रराजेंनी केली कामाची पाहणी; दर्जेदार कामाविषयी अधिकाऱ्यांना सूचना

Satara News : सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज या प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम लवकर पूर्ण करून सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. 

सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १८८५ साली कास धरण बांधण्यात आले. मात्र दिवसेंदिवस सातारा शहराचा विस्तार वाढत गेला, लोकसंख्या वाढली. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे यांनी कास धरणाची उंची वाढवण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. मार्च २०११ मध्ये आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या मागणीवरून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कास धरण प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यावेळी शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांच्या सहकार्यातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून या प्रकल्पाला ४२ कोटी निधी मिळवून दिला. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरु झाले. मात्र कालांतराने वाढीव निधीअभावी हे काम रखडले. पुन्हा शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून वाढीव निधीला प्रशासकीय मान्यता मिळवली तसेच तब्बल ५८ कोटी रुपये वाढीव निधीही मंजूर करून घेतला.

धरणात होणार ५०० दलघनफूट पाणीसाठा 

कास धरणाची उंची १२.४२ मीटर वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून उंची वाढवल्यानंतर या धरणात ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार आहे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, काम दर्जेदार व्हावे यासाठी आमदार शिवेंद्रराजे लक्ष देत असून त्यांनी आज सकाळी या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, शकील बागवान, रवींद्र ढोणे, राजू गोरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे, कास प्रकल्पाचे उप अभियंता जयवंत बर्गे, शाखा अभियंता आरिफ मोमीन आदी उपस्थित होते. 

नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये धरण भरेल

प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून मूळ धरणाच्या शीर्ष विमोचक विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. सांडव्याचे बांधकाम सुरु असून दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतींचे कामही सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर येत्या नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पामुळे संपूर्ण सातारा शहराचा आणि कास मार्गावरील १५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण करा. कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नका अशा सक्त सूचना शिवेंद्रराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या