Satara News : प्रतापगडाच्या तटबंदीच्या संवर्धनाचे कार्य पूर्ण


केवळ ९४ दिवसात मोहीम फत्ते; गतवर्षी कोसळला होता बुरूजाखालील भाग

Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तो प्रतापगड. त्या प्रतापगडाच्या तटबंदीच्या बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळ्यात ढासळला होता. अस्मानी संकट चालून आले होते. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी शिवभक्तांच्या सहकार्याने प्रतापगडाच्या तटबंदीच्या संवर्धनाचे कार्य हाती घेतले. ऑगस्ट २०२० ला प्रतापगडावर पण केला अन् तो केवळ अकरा महिन्यात पूर्ण केला. केवळ ९४ दिवसात ही मोहीम फत्ते केली. काम पूर्ण झाल्याची घोषणा मंगळवारी खासदार उदयनराजे यांनी केली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.  

मागच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरुवातीला प्रतापगडाच्या तटबंदीच्या पायाखालील भागाचे भूस्खलन झाले होते. त्यामुळे मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोहचले आणि त्यांनी तेथेच तटबंदीच्या संवर्धनाचा पण केला. कार्याला सुरुवात झाली. प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी दि. १३ जुलै २०२० रोजी राजधानी साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि राजमाता कल्पनाराजे यांची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. दि. १४ जुलै रोजी आमदार शिवेंद्रराजे यांचेही आशीर्वाद घेवून मोहिमेची पुढची घोडदौड कायम ठेवली.  

पुरातत्व विभागाची परवानगी महत्त्वाची असल्याने पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास व्हाळे आणि महाराष्ट्राचे डॉ. तेजस गर्दे यांनी परवानगी दिली. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी परवानगी दिली.

आधुनिक साधनसामग्रीचा वापर

बांधकाम करणार कोण असाही प्रश्न सह्याद्रीच्या मावळ्यांपुढे उभा होता. त्याकरिता चंदनकर इंजिनिअरिंग रिसर्च प्रा. लि. यांच्यासोबत चर्चा झाल्या. गजेंद्रगडकर यांच्याशी बैठका झाल्या. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. भोसले यांच्याशी बैठका झाल्या. अन् डिझाईन तयार केले. २७ जानेवारी २०२१ रोजी स्थानिकांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. गडावर मशिनरीचे सुट्टे पार्ट नेवून जोडले आणि अत्याधुनिक यंत्रणा वापरुन काम करण्यात आले. त्यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलींग, बोलटिंग - ग्राऊटिंग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. वरळी - वांद्रे सी लिंकला जी वायर रोप लागली ती येथे वापरण्यात आली. लोखंडी ताराची जाळी, तराई काम करण्यात आले. अन् अखेर महाराष्ट्र दिनी (दि. १ मे) काम पूर्ण  झाले.  

२२ दिवसात २१ लाखांचा निधी

या संवर्धनाच्या कार्यासाठी आर्थिक बाब महत्त्वाची होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी आवाहन करताच मदतीचा ओघ सुरू झाला. अनेक संस्था, शिवभक्त मदतीसाठी उभ्या राहिल्या. कोणी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, कोणी पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, कोणी आईच्या पुण्यतिथी निमित्ताने अर्थसहाय्य करत राहिले. अवघ्या २२ दिवसात २१ लाखांचा निधी उभा राहिला. त्यात फत्तेशिखस्त, फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दीपा लांजेकर, अजय बोरकर, रमेश परदेशी, अजय तापकिरे, प्राजक्ता माळी, माधुरी पवार या सर्वांनी देणग्या दिल्या. तसेच त्यांनीही आवाहन केले, अशी माहिती श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या