मसूरमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण मोकाट असल्याने 'निगेटिव्ह' लोकांची घरीच थांबण्याला पसंती
Satara News (बसवेश्वर चेणगे यांजकडून) : सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द असलेल्या मसूर या गावात कोरोनाने मोठा विळखा घातला असून मसूरमधील कोरोनाच्या हॉटस्पॉटमुळे मसूर व परिसरातील जनता पुरती घाबरून गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या घरातील लोक किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांच्या 'सैराट' वागण्यामुळे 'पॉझिटिव्ह'चा संपर्क टाळण्यासाठी 'निगेटिव्ह'नी घरीच थांबण्याची भूमिका घेणे निगेटिव्हवाले पसंत करताना दिसत आहेत.
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून त्याच्या परिणामांची माहिती असूनदेखील अनेकजण मास्क न वापरता फिरत असल्यामुळे मसूरकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना होऊ नये म्हणून एकीकडे जिल्हाधिकारी 'ब्रेक द चेन' चा आदेश काढत असले तरी त्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विनाकारण फिरणारांची कोरोना टेस्ट
मसूरमध्ये गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतीची मारुती व्हॅन माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित यांच्या प्रयत्नाने दुरुस्त करून ती प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्याचा उपयोग लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणारांची कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यासाठी केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी मसूर येथील ब्रह्मपुरी व अष्टविनायक पेठेत जावून तेथील जवळपास १०२ लोकांचे स्टॅब तपासले असता त्यातून चोवीस लोक कोरोना बाधित निघाले आहेत. तसेच सध्या मसूरमध्ये दिडशेच्या वर कोरोना बाधित पेशंट आढळून आले आहेत. ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. काही क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, तर काही होम क्वारंटाईन आहेत. पण जे होम क्वारंटाईन आहेत त्यांच्या घरातील लोक मात्र विविध कामांच्या निमित्ताने बँकांमध्ये व इतरत्र फिरून दुसऱ्यांंना कोरोनाचा 'प्रसाद' देत आहेत.
कोण पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह कळेना
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी जसे होम क्वारंटाईनचे शिक्के हातावर मारणे, घरावर किंवा त्या गल्लीमध्ये प्रतिबंधित क्षेत्र असे फलक लावणे आता बंद झाले आहे. परिणामी कोण पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह समजत नाही. कोरोनाबाधित व्यक्ती निगेटिव्ह व्यक्तीच्या जवळ जावून बिनधास्तपणे बोलत आहे. आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत हे लपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्या व्यक्ती स्वत:चा जीव तर धोक्यात घालत आहेतच, पण ते दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालत आहेत. याकडे गांभिर्याने कुणी बघायचे हाच खरा प्रश्न आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, मसूर गावचे लोकनियुक्त सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे यांनी मसूरमधील सर्व क्षेत्रातील लोकांची बैठक घेवून ९ मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. काँटॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांच्या सहकार्याने कॅम्प लावून तपासणी सुरू केली आहे. आपले गाव सुरक्षित रहावे यासाठी सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ग्रामपंचायतीच्या या सकारात्मक प्रयत्नांना ग्रामस्थांनी आपल्या आरोग्यासाठी साथ देणे गरजेचे आहे.
त्रुटी दूर झाल्यास संसर्गाला आळा बसेल
सध्या कोरोना टेस्ट सरकारी दवाखान्यांमधून जशी होत आहे, तशी ती खाजगी लॅबमध्येही होत आहे. या टेस्टिंगचे रेकॉर्ड आरोग्य विभागाकडे एकत्र मिळावे यासाठी खाजगी लॅबनादेखील आयडी पासवर्ड दिला आहे. परंतु खाजगी लॅबकडील माहिती ही अपलोड होण्यास विलंब होत असल्याने सरकारी यंत्रणेला कोरोना झालेल्या व्यक्तीची माहिती पाच - सहा दिवसांनी मिळते. तोवर ती व्यक्ती अनेकांना बाधित करून जाते. या व अशा प्रकारच्या त्रुटी दूर झाल्यास कोरोना संसर्गाला आळा बसू शकेल.
कोरोना रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचा वापर करावा असे आवाहन होत असले तरी मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण राबविताना जनतेने डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसविला आहे ही बाबही गंभीर मानावी लागेल. आता तर लस उपलब्ध नसल्याने मसूरकर धास्तावलेले दिसत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या