महिनाअखेरपर्यंत प्लांट सुरू होऊन विविध रूग्णालयांना होणार ऑक्सिजन पुरवठा
Satara News : कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा म्हणून आणि कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा या उदात्त हेतूने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिना अखेरपर्यंत प्लांट सुरु होईल आणि त्याद्वारे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
ऊस पुरवठादार सभासद, शेतकऱ्यांना नेहमीच उच्चतम दर देऊन राज्यातील एक आदर्श सहकारी संस्था असा नावलौकिक मिळवलेल्या अजिंक्यतारा कारखान्याने विविध उपक्रमांतून सातत्याने सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील पूरग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा, आपत्तीग्रस्तांसाठी मदत अशा विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकीतही अग्रेसर राहणाऱ्या या कारखान्याने सध्याची गंभीर परिस्थिती ओळखून कोरोना महामारीमध्ये रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि ऑक्सिजनअभावी रुग्णांची होणारी जीवघेणी हेळसांड थांबावी यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
२४ तासात ९० सिलिंडर भरणार
अजिंक्यतारा कारखान्यावरील या प्लांटमध्ये हवेतील ऑक्सिजन गोळा करून तो सिलिंडरमध्ये भरला जाणार आहे. या प्लांटमध्ये २४ तासांत प्रत्येकी १२ किलो ऑक्सिजनचे ९० जम्बो सिलिंडर भरले जाणार आहेत. वैद्यकीय सेवेसाठी उत्पादित केल्या जाणाऱ्या या ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के असणार आहे. येत्या महिनाअखेरीस हा प्लांट सुरु होणार असून याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णालयांना आणि पर्यायाने रुग्णांना होणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या