पुणे - सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांची फसवणूक; पोलिसांकडून दखल नाही
Satara News : नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने व दोन महिलांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली पैसे घेऊन सातारा व पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांची, सिव्हिल गार्ड व महिलांची फसवणूक करून लाखो रुपयांना गंडा घातल्याची आणि त्याबाबत तक्रार करूनही वाई पोलीस त्याची दखल घेत नसल्याची तक्रार माजी सैनिक रवींद्र गालिंदे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राजेश रामचंदर वैद्य (पत्ता माहीत नाही) याने वाईतील दोन महिलांना हाताशी धरून ब्येरेट सिक्युरिटी सर्व्हिसेस व फॅसिलिटी नावाची संस्था स्थापन केली. तसेच सावंत सिटी येथील एक बंगला भाड्याने घेऊन ऑफिस सुरू केले होते. या संस्थेला शिरवळ, खंडाळा येथील कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले असून त्यामध्ये दरमहा १८ ते २८ हजार रुपये अशा पगाराची नोकरी देतो, अशी जाहिरात या संस्थेने नोव्हेंबर २०२० मध्ये केली होती. त्यानुसार अनेक माजी सैनिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी प्रशिक्षण व इतर कारण देऊन सुरक्षा रक्षक पदासाठी प्रत्येकी सात हजार, सिव्हिल गार्डसाठी साडेतीन हजार व लेडीज गार्डसाठी अडीच हजार अशी रक्कम घेतली.
अशाप्रकारे त्याने सुमारे चार ते पाच लाख रुपये गोळा केले. मात्र, त्यानंतर चार पाच महिने होऊनही कोणतेही काम अथवा प्रशिक्षण दिले नाही. दिलेली रक्कम मागितली तर ती देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, राजेश वैद्य अचानक गायब झाला.
लवकरच संबंधितांवर कायदेशीर कारवाई
त्यामुळे ही संस्था बोगस असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वाई, सातारा, पाटण, भोर, राजापूर येथील १५ ते १६ माजी सैनिकांनी याबाबत १० फेब्रुवारी २०२१ रोजी वाई पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यामध्ये सुमारे १०० जणांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, माजी सैनिकांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे त्यास विलंब झाला. लवकरच चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या