कोरोनामुळे यंदा जंगलवाटांवर फक्त आणि फक्त वन्य जीवांचेच अधिराज्य
गजानन चेणगे
Wildlife News : दरवर्षी बुध्द पौर्णिमेला जंगलांमधील पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्य प्राण्यांची गणना करण्याची कित्येक वर्षांची परंपरा यंदा प्रथमच खंडित होत आहे. वन विभाग, वन्य जीव विभागाच्या वतीने विविध सेवाभावी, निसर्गप्रेमी संस्थांच्या सहकार्याने राबवला जाणारा हा उपक्रम यावेळी कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आज पाणवठ्याच्या जवळील मचाण अबोल होणार असून जंगलवाटांवर फक्त वन्य प्राण्यांचेच अधिराज्य राहणार आहे.
वैशाख पौर्णिमेला बुध्द पौर्णिमा म्हणतात. वर्षातील या रात्री चंद्र अधिक प्रकाशमान दिसतो. त्यामुळे या पौर्णिमेला धरून चोवीस तासात जंगलांमध्ये वन्य प्राण्यांची गणना केली जाते. कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. काही ठिकाणी बुध्द पौर्णिमेला धरून पाच - सहा दिवस याप्रमाणेही वन्य प्राणी गणना केली जात असते. जंगलातील पाणवठ्यांजवळ बांधलेल्या मचाणावर बसून पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्य प्राण्यांचे दर्शन अनुभवणे हा एक अविस्मरणीय असा अनुभव असतो. वन व वन्य जीव विभागाच्या या उपक्रमात निसर्ग व पर्यावरणप्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. त्यांच्यासाठी ही आयुष्यभरासाठी पुरणारी मर्मबंधातली ठेव असते.
जतन व संवर्धनासाठी दिशादर्शन
या वन्य प्राणी गणनेतून केवळ संख्या मोजणे इतकाच उद्देश साध्य होत नाही, तर जंगलक्षेत्राचे अंतरंग, तेथील जैवविविधता, तेथे जाणवणारे बदल, वन्य प्राण्यांचे वर्तन आणि एवूâणच जंगलाच्या हृदयाची स्पंदने जवळून अनुभवता येतात. त्यातून वन, पर्यावरण, जैवविविधता याच्या जतन व संवर्धनासाठी दिशादर्शन होत असते.
पण यंदा कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग थिजले आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. त्यामुळे लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यावेळी बुध्द पौर्णिमेची वन्य प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे. परिणामी ही अनेक वर्षांची परंपरा खंडित होत आहे. परिणामी बुध्द पौर्णिमा असुनही पाणवठ्याच्या जवळील मचाण अबोल राहणार आहेत आणि जंगलवाटांवर केवळ वन्य प्राण्यांचेच अधिराज्य राहणार आहे. कोरोनाने मानवी जीवन धोक्यात आले आहे. अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या