'कोव्हिड काल, आज आणि उद्या' या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमात मांडले विचार व अनुभव
Corona News : यापुढील काळात समाजाने कोव्हिडच्या नियमांचे पालन आणि लसीकरण यांची कास धरली तर कदाचित तिसऱ्या लाटेला आपल्याला योग्य रितीने सामोरे जाता येईल. तसेच गृहविलगीकरणाला छोटी घरे असल्याने मर्यादा आहेत. त्यामुळे वस्ती व गाव पातळीवर सामुहिक विलगीकरण व्यवस्था करून ठेवणे योग्य राहील, असे मत कोव्हिड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले.
स्त्री आधार केंद्र (पुणे) आणि महिला प्रबोधन व्यासपीठ (महाराष्ट्र) या संस्थांतर्फे आयोजित 'कोव्हिड काल, आज आणि उद्या' या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमात 'कोरोना प्रतिबंध आणि गृहविलगीकरणाच्या दक्षता' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्रात मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांचाही प्रमुख सहभाग होता. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे अध्यक्षस्थानी होत्या.
टास्क फोर्सच्या कार्याचा उहापोह
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोव्हिड टास्क फोर्सची निर्मिती कशी झाली, बैठकांमध्ये झालेल्या चर्चा आणि प्रत्येक टप्प्यावर केलेल्या नवनवीन उपाययोजना, गृहविलगीकरण करताना आलेली आव्हाने याविषयी डॉ. संजय ओक यांनी आपल्या मनोगतातून माहिती दिली. टास्क फोर्सच्या आतापर्यंत ६४ बैठका झाल्या. दर सोमवारी रात्री टास्क फोर्सची बैठक होते. ज्यात राज्यामध्ये कुठल्या ठिकाणी केसेस जास्त आहेत, कुठल्या प्रकारची लक्षणे दिसतायत या सगळ्याचा उहापोह होतो आणि काही मार्गदर्शक तत्त्व आरोग्य खात्याला दिली जातात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आजवरच्या इतर काही महामारींचा आणि संकटांचा उल्लेखदेखील त्यांनी यावेळी केला. कोरोनाचे संकट अचानक आपल्यावर आल्यानंतर शासनाच्या पातळीवर केलेली उपाययोजना, डॉक्टर्स, नर्सेस तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींनी समस्यांवर तोडगा कसा काढला याविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली.
धारावीतील थक्क करणारे अनुभव
मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबईतील धारावी या ठिकाणी आलेले काही थक्क करणारे अनुभव आणि त्या परिस्थितीत केलेल्या उपाययोजना याविषयी मनोगत मांडले. ‘सुरुवातीच्या काळात जेव्हा धारावीमध्ये आम्ही फिरलो, तेव्हा आमच्या लक्षात आले, की २ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे ८ ते १० लाख लोकसंख्या अशी परिस्थिती आहे. एका छोट्याशा १० बाय १५ च्या घरात ८ – १० लोक रहात होते. शिवाय तिथे राहणाऱ्या सर्व व्यक्ती सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होत्या. त्यामुळे आम्हाला मिळालेले ट्रेनिंग आणि या प्रत्यक्ष परिस्थितीत त्याची योग्य अंमलबजावणी हे फार कठीण होते. पण टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नवीन उपाययोजना करत आम्ही हे काम सुरु ठेवले.’ असं किरण दिघावकर म्हणाले. या काळात संपूर्ण मुंबईत असलेला तणाव, लोकांना आलेल्या अडचणी, काही कटू अनुभव तर काही सकारात्मक अनुभवदेखील त्यांनी मांडले.
प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे, विधानपरिषद उपसभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर आणि आयटी क्षेत्रात काम करणाNया श्वेता अभिजित भावे यांनी गृहविलगीकरणाचे आपले अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले. तसेच शालिनी मेहता, अस्मिता कोंडुसकर, शैलेश लिमये आणि नीलिमा जोशी यांनीदेखील कोव्हिड काळातले त्यांचे अनुभव व्हीडीओजच्या माध्यमातून व्यक्त केले.
आपले अनुभव पाठवण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन हे त्यांच्या मिती क्रिएशन्स या संस्थेतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम स्त्री आधार केंद्र आणि मिती ग्रूप या फेसबुक पेजेसवर तसेच मिती ग्रूप डिजिटल या युट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आला. यापुढील तीन शनिवारी म्हणजेच दि. १९ जून, २६ जून आणि ३ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजतादेखील ‘कोविड काल आज आणि उद्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाविषयी अधिक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल.
या प्रत्येक भागात नागरिकांना आलेले सकारात्मक अनुभवदेखील व्यक्त केले जातील. या अनुषंगाने नागरिकांना आपले अनुभव ५०० शब्दात लिहून पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तेव्हा आपले अनुभव ९९३०११५७५९, या क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा किंवा streeaadharkendra@gmail.com / neelamgorheoffice@gmail.com या ई-मेल आयडीवर मेल करा. अधिक माहितीसाठी संपर्क - ९०२८३३३३०५/०६
कार्यक्रमातून जगण्याची उमेद मिळेल !
प्रारंभी कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमामागची भूमिका प्रेक्षकांसमोर मांडताना, कोव्हिड काळात समाजात पसरलेली नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण तयार व्हावे हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम म्हणजे संजीवनी मिळून हयात असलेल्या मानवजातीचा उत्सव आहे आणि त्याचबरोबर एक दु:खाचा हुंदकासुद्धा आहे. कारण ज्यांच्या जीवनाची ज्योत मालवली त्यांच्यासाठी ही एक श्रद्धांजली आहे. या माध्यमातून समाजाला एक जगण्याची उमेद आणि मानवतेचा संदेशसुद्धा मिळणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या