पत्नीपाठोपाठ महान धावपटू मिल्खा सिंग यांनी चंदीगडमध्ये घेतला अखेरचा श्वास
Milkha sing News : ‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे देशाचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे आज पहाटे प्राणोत्क्रमण झाले. ते ९१ वर्षांचे होते. कोरोना संक्रमण झाल्याने चंदीगड येथील पीजीआय रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जगातील वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवलेल्या मिल्खा सिंग यांची कोरोनाविरूध्दची झुंज मात्र अपयशी ठरली. याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल मिल्खा यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे.
चंदीगडमधील पीजीआयएमईआर रुग्णालयात आयसीयूमध्ये मिल्खा सिंग यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, महानायक अमिताभ बच्चन, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह बॉलीवुडनेही शोक व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
राष्ट्र्कुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक
मिल्खा सिंग यांनी १९५८ च्या कार्डिफ कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक, आशियायी स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावली होती. अॅथलेटिक्समध्ये राष्ट्र्कुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. १९५६, १९६०, १९६४ च्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. १९६० च्या ऑलिंपिकमध्ये अवघ्या ०.१ सेकंदाने त्यांचे पदक हुकले होते. मिल्खा सिंग यांना पाकिस्तानचे जनरल आयुब खान यांनी ‘फ्लाईंग सिख’ ही उपाधी बहाल केली होती. १९५९ साली त्यांना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते. २००१ साली त्यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु त्यांनी तो नाकारला.
'भाग मिल्खा भाग' चित्रपट
सन २०१३ च्या दरम्यान त्यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट निघाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले होते आणि फरहान अख्तर यांच्यासह सोनम कपूर, दिव्या दत्ता, योगराज सिंह आणि प्रकाश राज यांनी भूमिका साकारल्या होत्या. मिल्खा सिंग यांनी पदके व पुरस्कार पतियाळा क्रीडा संग्रहालयाला दान केले आहेत. पंजाब राज्याचे क्रीडा संचालक म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले होते. त्यांनी कारगिल युध्दातील शहीद विक्रम सिंग यांच्या मुलाला दत्तक घेतले होते.
पत्नीचेही याच आठवड्यात निधन
त्यांनी आपल्या आत्मचरित्राचे हक्क केवळ एक रूपयांना विकले होते. त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंग हा गोल्फपटू आहे. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर या भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या. याच आठवड्यात (१३ जून) त्यांचे कोरोनाने निधन झाले होते. तथापि, मिल्खा सिंगही रूग्णालयात जीवनमृत्यूची लढाई लढत असल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत याची त्यांच्या कुटुंबियांना खंत होती. आज त्यांच्यावर याही दु:खाचा डोंगर कोसळला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या