ज्यांनी आरक्षण कपात केली, त्यांच्याच घरी आरक्षणासाठी बैठक हा मोठा विनोद
Reservation News : भाजपच्या करणीने समाजाचे नुकसान होत असताना त्यांनाच साथ देणारे ओबीसी नेते हेच आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. ओबीसी समाजाने आता या नेत्यांना ओळखावे व तांदळातील खड्याप्रमाणे त्यांना बाजुला फेकून द्यावे किंवा मग आरक्षण विसरून जावे, असे धनगर समाज एकीकरण कमिटीचे अध्यक्ष व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीच ओबीसी आरक्षण कपातीच्या फाईलवर सही केली आहे आणि भाजपचे ओबीसी नेते त्याच फडणवीस यांच्या घरी ओबीसी आरक्षणाची बैठक घेतात यासारखा मोठा विनोद नाही. ज्यांनी ओबीसी समाजातील दिग्गज नेत्यांची राजकारणात माती केली, त्यांच्याच नादी लागून काही ओबीसी नेत्यांना त्यांचे गुलाम होण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यासारखे दुर्दैव नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.
कोरोना संकटाचे भानही नाही
मराठा, धनगर, ओबीसी आरक्षण केवळ लोकसभा देऊ शकते, पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात. त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारच्या हातात काही नाही हे भाजपच्या सर्व नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी फडणवीस आणि कंपनी पछाडली आहे. कोरोना संकटाचे भानही त्यांना राहिलेले नाही हे महाराष्ट्र पहात आहे. पण यात यश येत नसल्यामुळे रस्त्यावर उतरायचे, आंदोलने करायची, असंतोष निर्माण करायचा हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे कोरोना आपोआप वाढेल, लोक मरतील, पण त्याच्याशी या आंदोलनकर्त्यांना काही देणेघेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.
पुन्हा पुन्हा तीच खोटी आश्वासने
आम्हाला सत्ता द्या, सत्तेत आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करु असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण पाच वर्षे सत्ता भोगुनही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धनगर समाजाचा त्यांच्यावर काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. आता पुन्हा पुन्हा तीच खोटी आश्वासने देवेंद्र फडणवीस कशासाठी देत आहेत, असा सवाल हेमंत पाटील यांनी केला आहे.
फडणवीस फसवणूक करत आहेत
माझ्या हातात सत्तेची सूत्रे दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन अशी भीमगर्जना फडणवीस यांनी केली आहे. त्याबाबत पाटील यांनी फडणवीस यांचा खोटेपणा समोर आणला आहे. स्वत: मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला विरोध करणारे फडणवीस आता महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण तापवून ओबीसींची फसवणूक करत आहेत. परंतु ओबीसी समाज त्यांच्या थापालॉजीला बळी पडणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या